मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण ३ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास फुटल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये १३ घरांसह २४ जण  बेपत्ता झाले होते. त्यापैकी आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच एक जण आश्चर्यकारक वाचला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या धरण दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सर्व मृतदेह शोधण्यासाठी यापुढेही सर्च ऑपरेशन्स सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, रत्नागिरीच्या तिवरे धरण फुटीची एसआयटीकडून चौकशी होणार आहे. याबाबत माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तसेच आतापर्यंत चार लाखांची मदत करण्यात आली आहे. तातडीने रोखीत काहींना १० हजार रुपये मदत म्हणून सरकारकडून देण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची मदत राज्य सरकार करणार आहे. तसेच वाहून गेलेली घरे चार महिन्यांत पुन्हा बांधून देणार असल्याचेही महाजनांनी सांगितले.  



तिवरे धरण दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी नमूद केले आहे. दुर्घटनाग्रस्त तिवरे धरणाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिपळूणचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण हेच याच धरणाचे ठेकेदार असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या भावाच्या खेमराज कन्स्ट्रक्शन कंपनीनं हे धरण बांधले होते. केवळ २० वर्षांत हे धरण फुटल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तिवरे अपघाताला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केलीय दापोली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी केली आहे.