Zika Virus: महाराष्ट्रात झिका व्हायरसचा रुग्ण, पालघरमध्ये 7 वर्षांच्या मुलीला लागण
मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती
Maharashtra Zika Virus : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात सात वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचं आढळून आले आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये पुण्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बाधित मुलगी पालघर जिल्ह्यातील झाई आश्रमशाळेतील आहे.
मुलीवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 2021 मध्ये पुण्यात पहिला रुग्ण आढळला होता. वर्षभरानंतर आता दुसरी केस सापडली आहे. झिका विषाणू हा डासांमुळे पसरणारा धोकादायक आजार आहे. त्यासाठी लस तयार करण्याचे काम सुरू झालं आहे
2021 मध्ये केरळमध्ये झिका विषाणूचा पहिला रुग्ण
9 जुलै 2021 रोजी केरळमध्ये झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तिरुअनंतपुरमजवळील प्रसल्ला इथं राहणाऱ्या 24 वर्षीय गर्भवती महिलेमध्ये हा संसर्ग आढळून आला. त्याचा नमुना तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी इथं पाठवण्यात आला होता. त्यावेळी 19 पैकी 13 नमुन्यांमध्ये झिका व्हायरसच्या संसर्गाची पुष्टी झाली होती. यानंतर झिका विषाणूचा संसर्ग इतर अनेक राज्यांमध्येही आढळून आला.
झिका व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं
झिका विषाणू डासांमुळे पसरतो. हा रोग मुख्यतः एडिस इजिप्ती डास चावल्याने होतो. या डासामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाचाही प्रसार होतो. झिका विषाणूच्या संसर्गाची लक्षणे म्हणजे ताप, हात-पाय दुखणे, त्वचेवर खुणा येणे, डोळे येणं ही प्रमुख लक्षणं आहेत.