आपल्याला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलंय. मात्र आपण ते अजून घेतलं नसल्याचं, शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी सांगितलं. तर सर्व जण आपल्याला सांगताहेत आता जे दिलंय ते घ्या. मात्र आदिती तटकरेंच्या (Aditi Tatkare) मंत्रिपदात लुडबुड करू नका, अशी मिश्किल टिप्पणीही गोगावले यांनी रायगडमध्ये (Raigad) केली. तसंच पुढील मंत्रिमंडळात आदिती तटकरे यांच्यासोबत आपणही मंत्री असू असंही त्यांनी थेट आदिती तटकरे यांच्यासमोरच जाहीर केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगडच्या माणगाव एस टी बस स्थानकातील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी भरत गोगावले बोलत होते. मला एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिलं असून मी अजून ते घेतलं नसल्याचा खुलासा यावेळी त्यांनी केला. मला सगळे म्हणतात आदिती ताईंच्या मंत्रीपदात घुसवाघुसवी करू नका अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 


भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?


"दोन ते तीन दिवसांपूर्वी मला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं. हे मोठं अध्यक्षपद आहे. त्याला कॅबिनेटचा दर्जा आहे. पूर्वीच्या मंत्र्यांकडे सर्वच अधिकार आहे. परवा मुख्यमंत्र्यांनी जीआर काढला आहे. नागपुरात असताना त्यांनी फाईल मागवून स्वाक्षरी केली आणि आदेश पारिते केले. आम्ही अद्याप ते घेतलेलं नाही, कारण तिकडे गेलेलोच नाही. आम्ही त्यासंबंधी चर्चा करत आहोत. सर्वांचं म्हणणं आहे की, जे आलं आहे ते घ्यावं, ताईच्या मंत्रीपदात घुसवाघुसवी करु नका. असं काही मी करत नसून ते करण्याचं कारण नाही. पण नंतर जेव्हा निवडून येऊ तेव्हा पुन्हा एकदा आम्ही मंत्री असू हादेखील शब्द देतो. काळजी कऱण्याचं कारण नाही," असं भरत गोगावले म्हणाले आहेत.