SSC Result 2021: दहावीच्या ऑनलाइन निकालाची वेबसाईट हॅक? यावर शिक्षण विभाग म्हणतंय...
दहवीचा निकाल मुलांच्या हाती पडण्याआधी वेबसाईटला ऑक्सिजनची गरज? शिक्षण विभाग म्हणतंय हॅक झाल्याचा संशय
दीपक भातुसे झी मीडिया मुंबई: दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. मात्र दुपारपासून वेबसाईटवर हा निकाल दिसत नसल्यानं विद्यार्थी आणि पालक हैराण झाले होते. ही वेबसाईट सुरू होत नसल्यानं चिंता व्यक्त केली जात होती. नुकतीच एक मोठी बातमी शिक्षण विभागातून येत आहे. दहावीच्या निकालाची वेबसाईट हॅक झाल्याचा शिक्षण विभागाला संशय आहे.
दुपारी 1 वाजल्यापासून दहावीच्या निकालाची वेबसाइट सुरू होत नव्हती. वेबसाइट उघडण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. शिक्षण विभागाने हावीच्या निकालाची वेबसाईट हॅक झाल्याचा शिक्षण विभागाला संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आता चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यापूर्वी दहावी निकालाच्या वेबसाईटला अशी अडचण निर्माण झाली नव्हती. यावेळी मात्र निकाल जाहीर होऊनही वेबसाईटवर अनेक तास निकालच पाहता आला नाही. त्यामुळे ही वेबसाईट हॅक केल्याचा शिक्षण विभागला संशय आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षी अंतर्गत मूल्यमापनावर लागलेल्या दहावीच्या निकालात मार्कांची लयलूट झालेली पाहायला मिळत आहे. यावर्षी ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यात यावर्षी ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांना ९० टक्केहून अधिक गुण आहेत तर ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण आहेत. निकालानंतर तब्बल 6 तासांहून अधिक काळ वेबसाईट क्रॅश झाली. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.