10th and 12th examination fee : दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढीची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तोट्यात आहे. त्यामुळे परीक्षा शुल्कवाढीचा प्रस्ताव तयार केलाय. मंडळाला 50 कोटींचा फटका बसत आहे. आर्थिक नुकसानावर नियंत्रणासाठी दहावी-बारावीचं परीक्षा शुल्क 30 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. याआधी 2017मध्ये मंडळानं परीक्षाशुल्क वाढवले होते. त्यानंतर आता हा प्रस्ताव पुढे आला आहे. हा प्रस्तावाला मान्यता मिळाली तर पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य मंडळाकडून राज्यात साधारणपणे 25 ते 30 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींचे शुल्क आदी माध्यमातून राज्य मंडळाला उत्पन्न मिळते.  गेल्या सहा वर्षांत परीक्षा शुल्कवाढ केलेली नाही. तर दुसरीकडे अन्य खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परीक्षा शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव आहे.


 राज्य मंडळाला राज्य सरकारकडून निधी दिला जात नाही. आस्थापना खर्चासह शासनाच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन यासह विद्यार्थ्यांसाठीच्या सोयीसुविधा, परीक्षकांचे मानधन, कंत्राटी कर्मचाऱ्याचे वेतन आदी खर्च मंडळालाच करावा लागत आहे. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी परीक्षा शुल्क वाढीचा हा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे.


गेल्या काही वर्षांमध्ये इंधनाचे दर वाढले, कागदाचे दर वाढले, मनुष्यबळाचा खर्च मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांचा तोटा राज्य मंडळाला सहन करावा लागत आहे. त्यामुळे परीक्षा फी वाढविण्याचा निर्णय घेण्याबाबत विचार करण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार 30 टक्के दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला आहे.