मुंबई : गेल्या दीड वर्षापासून आपण सर्वजण कोरोनाचा सामना करतोय. कोरोना कधी संपणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर 2022च्या मध्यांतरापर्यंत आपण नॉर्मल आयुष्य जगण्याचा काळ येईल असं विधान राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या अगोदरच्या नॉर्मल आयुष्याकडे आपण वाटचाल करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीकरणाबाबत बोलताना डॉ. ओक म्हणाले, "लसीकरण सध्या जे होतंय ते अगोदर व्हायला हवं होते. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे निर्माण होणाऱ्या हर्ड इम्यूनिटीमुळे हळूहळू गोष्टी आपल्या नियंत्रणात राहतील. हर्ड इम्यूनिटी 100 टक्के निर्माण होणार नाही. कारण 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण झालेलं नाही."


काही महिने शिक्षणात हायब्रीड संकल्पना स्विकारावी लागेल. काही विद्यार्थी शाळेत आणि काही विद्यार्थी घरात राहून शिकतील. क्षमतेच्या 50 टक्केच मुलं शाळेत येतील आणि ते पुन्हा एक दिवसा आड येतील, असंही डॉ. ओक म्हणाले.


डॉ. ओक यांच्या सांगण्यानुसार, "आरोग्य क्षेत्रातील लोकांना बूस्टर डोस द्यावा लागेल. टास्क फोर्स यावर विचार करतंय. येत्या सोमवारी याबाबत चर्चा करण्यात येईल. त्याचप्रमाणे 60 वर्षांवरील आणि हाय रिस्क कॅटेगरीतील लोकांना बूस्टर डोस देण्याबाबत विचार करतोय."


"कोरोना रूग्णसंख्या वाढत नाहीये तर बरे होऊन घरी परतणाऱ्या रूग्णांची संख्याही अधिक आहे. हा आजार गंभीरतेकडे जाणार नाही, अशी औषधं आता उपलब्ध आहेत. मात्र बेफिकीर वागू नये. असं केल्यास रूग्णसंख्या वाढण्यासोबत नवा व्हेरियंट येऊ शकेल. मात्र लाट येणार नाही, असं ठामपणे म्हणू शकत नाही. पण त्याच्या परिणामकारकतेची काळजी घेतोय."


कोव्हॅक्सीन आणि झायडस कॅडिलाची लस लहान मुलांसाठी येत्या काळात उपलब्ध होईल. 2022च्या सुरूवातीपर्यंत सर्व अंदाज घेऊनच जम्बो कोवीड केयर सेंटर काढली जातील, असं त्यांनी म्हटलंय.