नव्यानं लागण झालेल्या रुग्णांचा आकडा धडकी भरवणारा
कोरोनाच्या संसर्गामुळे आणखी सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे : राज्यात कोरोना काही थांबायचं नाव घेत नाही. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात कोविड -19च्या 284 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या नव्या रूग्णांमुळे संक्रमित लोकांची संख्या 5,57,139 झाली आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी नवीन प्रकरणं समोर आली आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे आणखी सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची एकूण संख्या 11,386 झाली आहे. ठाण्यात सध्याच्या परिस्थितीत संक्रमणाचं प्रमाण 2.04 टक्के आहे.
तर दुसरीकडे देशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. देशात (India) गुरुवारी 31,923 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 3,35,31,498 झाली आहे. तर सक्रिय रुग्णांत घट होऊन ती 3,01,604 झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 282 जणांचा मृत्यू झालाय. यासह कोविड -19च्या एकूण मृत्यूची संख्या 4,46,050 वर गेली आहे. देशव्यापी कोविड -19 लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत 83.39 कोटींपेक्षा जास्त डोस पूर्ण करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्यात बुधवारी दिवसभरात 4 हजार 285 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत राज्यात 63 लाख 49 हजार 29 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.21 टक्के एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात 3 हजार 608 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 48 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या एकूण 39 हजार 984 करोना बाधित रुग्ण आहेत.