दहावी-बारावी परीक्षा यंदा दहा दिवस आधी, `या` तारखांना होणार परीक्षा?
SSC-HSC Exam TimeTable : राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा दहा दिवस आधी घेण्याचा विचार सुरु आहे.
SSC-HSC Exam TimeTable : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा यंदा दहा दिवस आधी घेण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ऐवजी 11 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 1 मार्च ऐवजी 20 मार्चला घेण्याचा विचार सुरु आहे. यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून हरकती आणि सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बारावीनंतरच्या प्रवेश परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन वेळापत्रकात बदल करण्याची राज्य शिक्षण मंडळाचा विचार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता 12 वीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात घेतल्या जातात. यार परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसंच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसंच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचाविचार करता येत्या 2025 ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इयत्ता 12वी आणि इयत्ता 10वीची परीक्षा नेहमीपेक्षा 18 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा विचार आहे. लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा ठरलेल्या तारखांना घेण्याचे नियोजित आहे, असं मंडळाने म्हटलं आहे.