महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठी रेड कार्पेट, सरकार या सुविधा देणार
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठी सरकारने वेगवेगळ्या सुविधा द्यायचा निर्णय घेतला आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठी सरकारने वेगवेगळ्या सुविधा द्यायचा निर्णय घेतला आहे. नव्यानं उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी एमआयडीसी औद्योगिक शेड उभे करून देणार आहे. तसंच वेगवेगळ्या परवानग्यांऐवजी महापरवाना घेऊन उद्योग सुरू करता येईल. तसंच एमआयडीसी बाहेरील जमीन अधिगृहित करून उद्योग सुरु करायला चालना दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.
परदेशी गुंतवणूकदारांसाठी एमआयडीसीने राज्याच्या वेगवेगळ्या भागात सुमारे ४० हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. यामध्ये वीज, पाणी रस्ते यांच्यासारख्या पायभूत सुविधाही सज्ज आहेत. उद्योजकांनी गुंतवणूक केल्यानंतर थेट उत्पादन सुरू करण्यासाठी एमआयडीसी स्वखर्चाने औद्योगिक शेड उभी करणार आहे. तसंच याठिकाणी प्ले अॅण्ड प्लगद्वारे थेट उद्योग सुरू करता येणार आहे.
परदेशी गुंतवणूकदारांच्या सल्लागारांसोबत उद्योग विभागाचे अधिकारी चर्चा करत आहेत. शिवाय वेगवेगळ्या देशांच्या वाणिज्यदुतांसोबतही चर्चा केली जाणार आहे.
मनुष्यबळाची टंचाई जाणवू नये यासाठी राज्य सरकार कामगार ब्युरोचीही स्थापना करणार आहे. कामगार ब्युरोमुळे उद्योगांना लागणारे कुशल, अकुशल मनुष्यबळ अवघ्या ७ दिवसांमध्ये पुरवण्याचं नियोजन उद्योग विभागाने केलं आहे. गुंतवणूकदारांनी या संधीचा फायदा घ्यावा, असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. सुभाष देसाई ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज व वर्ल्ड ट्रेड सेंटरच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.