बळीराजा सुखावणार! राज्यात पुढील 3 दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह `या` जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Rain Update: ऑगस्ट महिन्यात मान्सूनने ब्रेक घेतला होता. अखेर सप्टेंबरमध्ये पाऊस पुनरागमन करणार आहे. हवामान विभागाने याबाबत अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Rain Update: ऑगस्ट महिन्यात दडी मारुन बसलेला पाऊस सप्टेंबरमध्ये सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
ऑगस्टमहिन्यात मान्सूनने ब्रेक घेतला होता. यंदाचा ऑगस्ट हा देशातील 1901 नंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना ठरला आहे. इतिहासातील चौथा मोठा मान्सूचा ब्रेक म्हणून नोंदवला गेला आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये पाऊस पुनरागमन करणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात पावसाचे पुनरागमन होणार आहे. राज्यात पुढच्या 4-5 दिवसात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार स्थितीमुळं तिथे येत्या 48 तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे, अशी माहिती कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच 3-7 सप्टेंबरमध्ये कोकण आणि गोव्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 5 ते 7 सप्टेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे. राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचा यलो अरल्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या सामान्य पाऊस पडणार असून 91 ते 109 टक्के पावसाची नोंद होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
भंडाऱ्यात पावसाचे पुनरागमन
भंडारा जिल्ह्यात अखेर 15 दिवसाच्या विश्रांती नंतर आज पावसाने हजेरी लावली आहे. मागील 15 दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती त्यामुळं शेतकरी चिंतेत सापडला होता. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.
गोंदियातही पावसाची हजेरी
आठ दिवसाच्या दिवसाच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसाच्या बँटींगने बळीराजा सुखावला आहे. आज आलेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे धान पिकांना नक्कीच फायदा होणार आहे .