पवारांना बालेकिल्ल्यात जाऊन नडला पण जोरदार पडला! अभिजित बिचुकलेंना NOTA पेक्षा सातपट कमी मतं
Abhijit Bichukale total Votes: बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात अभिजित बिचुकलेने निवडणूक लढवली होती.
Abhijit Bichukale total Votes: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी पुढे होती तर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकारला भरघोस यश मिळाले आहे. निवडणूक कोणतीही असो चर्चा असते ती अभिजित बिचुकलेच्या उमेदवारीची. लोकसभेतही त्याने आपले नशिब आजमावले होते. तिथे त्याला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यानंतरही तो खचला नाही. त्यांने विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपले नशिब आजमावले. आणि तो पुन्हा हरला. लोकसभेत त्यांने श्रीकांत शिंदे आणि उदनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. विधानसभेत त्यांने बारामतीत जाऊन पवारांच्या बालेकिल्ल्यातच तळ ठोकला होता. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कवी, अभिनेता अभिजित बिचुकलेला किती मत मिळाली? जाणून घेऊया.
बारामतीची निवडणूक पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे शरद गटाचे युगेंद्र पवार यांच्यात कोण जिंकणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. यात अजित पवार 1 लाखांहून अधिक मतांनी जिंकून आले. या विजयामुळे त्यांचा राजकीय प्रभाव आणि बारामती भागातील त्यांची पकड आणखी मजबूत झाली. या निवडणुकीत अजित पवारांनी चमकदार कामगिरी करत आपली राजकीय कारकीर्द आजही भक्कम असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. पण या निवडणुकीत अभिजित बिचुकले हेदेखील त्यांचा प्रतिस्पर्धी होता.
अभिजीत बिचुकलेचा दणदणीत पराभव
युगेंद्र पवार यांच्या पराभवानंतर अभिजीत बिचुकलेच्या पराभवाची बारामतीत चर्चा होती. बिचुकलेसाठी हा निवडणूक निकाल अत्यंत निराशाजनक होता. अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या बिचुकलेला केवळ 94 मतांवर समाधान मानावे लागले. या मतदार संघात NOTA (नन ऑफ द अबोव्ह) ला देखील अभिजीतपेक्षा जास्त मते मिळाली. ज्यांची संख्या 700 पेक्षा जास्त होती. या निकालावरून बारामतीतही 'बिचुकले फॅक्टर'ला विशेष पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले.
बारामती विधानसभा निवडणुकीत एकूण 24 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी अभिजीत बिचुकले 20 व्या क्रमांकावर आहेत. बारामती विभागातील अजित पवारांच्या स्थानाला आव्हान देणे अभिजित बिचुकले यांना कठीण असल्याचे निवडणूक निकालांनी स्पष्ट केले.
श्रीकांत शिंदेंविरोधातही लढवली निवडणूक
कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटातून उमेदवार म्हणून वैशाली दरेकर उभ्या होत्या. पण त्या दोघांची चर्चा एकीकडे सुरु असताना दुसरीकडे चर्चा ही अभिजीत बिचुकलेची सुरु होती. अभिजीत बिचुकले यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढत होता. पण अभिजीत बिचकूलेला कल्याण मतदार संघातून 1808 मत मिळाली आहेत.
साताऱ्यातही हार
अभिजित बिचुकलेने यापूर्वी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही नशीब आजमावले होते आणि साताऱ्यातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, तेथेही त्याचा पराभव झाला. त्याला केवळ 1 हजार 395 मते मिळाली. साताऱ्यातून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले होते.