`अजित पवारांवर टीका करु नका कारण...`; महाराष्ट्र BJP ची RSS ला कळकळीची विनंती
Maharashtra BJP Request To RSS: लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार अजित पवार गटावर टीका झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच आता थेट भाजपानेच अजित पवार गटासाठी आरएसएसकडे शब्द टाकला आहे.
Maharashtra BJP Request To RSS: लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मागील महिन्याभरामध्ये अनेकदा या कामगिरीचं खापर अजित पवार गटावर फोडण्यात आलं आहे. आधी 'ऑर्गनायझर' आणि त्यानंतर 'विवेक साप्ताहिका'मधून अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय अंगलट आल्याचं भाजपाच्या राज्यातील सुनावताना म्हटलं गेलं. मात्र आता अजित पवार गटावर होणाऱ्या या टीकेवरुन भाजपाने थेट संघाकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करण्याची मागणी केली आहे.
या बैठकीमध्ये काय घडलं?
पुढील काही महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवारी मुंबईत पार पाडली. या बैठकीमध्ये भाजपाच्या नेत्यांनी संघाला विधानसभेला सहकार्य ठेवण्याची मागणी केली. भाजप आणि संघाच्या बैठकीत राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा करण्यात आली. भाजपाने आपली भूमिका संघासमोर स्पष्ट करताना, "अजित पवार यांच्या मदतीची भाजपला गरज आहे. त्यामुळेच संघाने अजित पवार गटावर टीका करणं टाळावं," अशी विनंती देखील भाजप नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीत केल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाकडून या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते. तसेच बैठकीसाठी कोकण प्रांतातील संघाच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती या बैठकीला होती.
संघाने भाजपाला काय सुचवलं?
दुसरीकडे भारतीय जनता पार्टीला संघाने सल्ला देताना, विधानसभा निवडणूक जवळ असल्यानं पक्षांतर्गत ताळमेळ ठेवण्यावर अधिक भर द्यावा असं सांगितलं. याचसंदर्भातील सविस्तर सूचना भाजप नेत्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच लोकसभेत ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यावर भर देण्यासंदर्भात भाजप नेत्यांना संघाकडून निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी दिवसात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करा, असंही भाजपाच्या नेत्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सुचवलं आहे.
नक्की वाचा >> 'मोदी सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस! खोकेशाहीच्या..'; बजेटवरुन ठाकरेंचा घणाघात
मतदार नोंदणी आणि यादीचीही चर्चा
मंगळवारी मुंबईत झालेल्या या बैठकीत मतदार नोंदणी मोहिमेचा देखील आढावा घेतला गेल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीतील पारंपारिक मतदार यादीतून गायब झाल्याच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचनाही भाजपाला करण्यात आली आहे.
भाजपा नेत्यांची गोची
'ऑर्गनायझर' आणि त्यानंतर 'विवेक'मधून झालेल्या टीकेनंतर भाजपाच्या महाराष्ट्रतील नेत्यांची चांगलीच गोची झाली होती. यावेळेस भाजपाच्या नेत्यांनी सावरुन घेण्याची भूमिका घेतली होती. तर सदर टीकनंतर शिंदे गटाने सारवासारवीची उत्तर देताना अजित पवार हे महायुतीचा महत्त्वाचा घटक असल्याचं म्हटलं होतं. अशी राजकीय गोची टाळण्यासाठीच आता भाजपाने थेट संघाकडेच टीका न करण्याची मागणी केली आहे.