Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar: बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक नसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा लढवण्यासाठी नवा मतदारसंघ शोधल्याची चर्चा आहे. आपल्याला विधानसभा निवडणूक लढण्यात रस राहिला नसल्याचं सांगतानाच, "बारामतीतून मी देईन त्या उमेदवाराला निवडून द्या," असं आवाहन अजित पवारांनी वेळोवेळी केलं आहे. त्यामुळे यावेळी अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याची शक्यता बळावली आहे.


कुठून लढणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच बारामती नाही तर अजित पवार कुठून उभे राहणार असा प्रश्न चर्चेत असतानाच आता एका मतदारसंघाचं नाव समोर येत आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. ज्या मतदारसंघाबद्दल आपण बोलोतोय त्याचं नाव आहे शिरुर! होय, अजित पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.


पवार विरुद्ध पवार


अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढणारच नसतील तर ठीक आहे, परंतु निवडणूक लढण्याचा निर्णय झाला तर कुठून लढतील याविषयीचे तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशातच अजित पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे.  शिरूरमधून गेल्या निवडणुकीत एक एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅडव्हकेट अशोक पवार विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचरणे यांचा पराभव केला होता. विद्यमान आमदार अशोक पवार हे पक्षफुटीनंतर शरद पवारांसोबतच राहिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी कडून यावेळीही त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 


अजित पवारांचं नाव चर्चेत आल्यानं...


दुसऱ्या बाजूला महायुतीच जागावाटप अद्याप झालेलं नसलं तरी या जागेवर परंपरागत मतदारसंघ म्हणून भाजपने दावा केला आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले प्रदीप कंद उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. असं असताना अजित पवारांच्या उमेदवारीचा विषय आला तर त्यांना आणि एका अर्थाने भाजपला माघार घ्यावी लागू शकते. अजित पवारांचं नाव चर्चेत आल्यामुळेच शिरूरमध्ये भाजप किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी सध्यातरी फारसं कुणी जोर लावत असल्याचं चित्र दिसत नाहीये. या आठवडाभरात शिरूरचा विषय स्पष्ट होईल असे संकेत आहेत.


काका विरुद्ध पुतण्या


प्रथम अजित पवार यांचा डीएनए बारामतीचा आहे त्यामुळे ते बारामतीतूनच निवडणूक लढवतील असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे. अजित पवारांनी विधानसभा लढवण्याबाबत घेतलेली भूमिका सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टीका देखील होत आहे. बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरतील अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काका विरुद्ध पुतण्या अशी लढत झाल्यास अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या परिस्थितीत राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडून नवनवीन खेळी खेळल्या जात आहेत. सध्या बारामतीविषयी जे काही सुरू आहे ते त्याचाच भाग असल्याचं म्हणावं लागेल.