अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजपा-शिंदेंचा मास्टर प्लॅन? जाणीवपूर्वकरित्या...
Ajit Pawar NCP To Exit Mahayuti Before Vidhan Sabha Election 2024? मागील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांचा पक्ष असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
Ajit Pawar NCP To Exit Mahayuti Before Vidhan Sabha Election 2024? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भुकंप घडवत 2023 च्या मे महिन्यामध्ये अजित पवारांसहीत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांनी माहायुतीतून एक्झिट घ्यावी यासाठी चक्रव्यूह आखलं जातंय की काय अशा जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अजित पवार महायुतीतून वेगळे होऊन स्वतंत्र लढावे यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून यासाठी आक्रमक रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दोघे विरुद्ध एकटे सामना
अजित पवारांनी महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजपा व शिंदेंच्या शिवसेनेकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळत आहे. जागावाटपाच्या अंतिम टप्प्यामध्ये अजित पवार वेगळे झाले तर भाजप व शिंदेंच्या शिवसेनेला अधिकाधिक जागा लढवता येतील, अशी रणनीती आखली जात असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील भाजप व शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवार असा अंतर्गत सामना रंगत असून मतभेद तीव्र झाल्याचं सांगण्यात येत आहे. ‘महायुती’मध्ये भाजप व शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवार यांचा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ असा अंतर्गत सामना रंगला असून मतभेद तीव्र होऊ लागले आहेत.
अनेकदा उडाले खटके
शिंदेच्या पक्षातील आमदार संजय गायकवाड व भाजपचे राज्यसभेतील खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली. भाजप आमदार नितेश राणे यांनी अलीकडेच एका विशिष्ट समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यांवरही अजित पवार आणि सुनील तटकरेंनी जाहीरपणे प्रसारमाध्यमांसमोर तसेच सभांमध्ये आक्षेप नोंदविला. इतकेच नाही तर थेट दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला. मात्र महायुतीमध्ये अजित पवारांच्या पक्षाची जाणीवपूर्वक कोंडी करण्यासाठी ही रणनीती अप्रत्यक्षपणे वापरली जात असल्याची चर्चा आहे. भाजप तसेच शिंदेंच्या शिवसेनाचा काँग्रेसविरोध आणि कट्टर हिंदुत्ववाद अजित पवारांना मान्य नसेल तर त्यांना बाहेर पडावे, तसा पर्याय त्यांच्यासाठी मोकळा असेल, असा संदेश या माध्यमातून दिला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नक्की वाचा >> 'शिंदे सरकारने राज्यावरील कर्ज ₹8000000000000 वर नेलं; ‘लाडकी खुर्ची’...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
हे कारण देत सत्तेतून बाहेर पडणार अजित पवार?
महायुतीत राहिल्यास कमीत कमी जागा घेऊन अजित पवारांना निवडणूक लढवावी लागणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. ही तडजोड स्वीकारायची नसल्यास वेगळे होऊन लढण्याशिवाय अजित पवारांच्या पक्षाकडे इतर कोणताही पर्याय उरणार नाही असे सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे जागावाटपातील अपेक्षाभंगाचं कारण देत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवारांचा पक्ष महायुतीतून बाहेर पडल्यास भाजप व शिंदेंच्या पक्षाच्या पथ्यावर पडणार असल्याने अजित पवारांची कोंडी करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वकपणे होत असल्याचे मानले जाते.
अजित पवार यासाठी एकटे लढू शकतात
सध्या अजित पवारांच्या पक्षाकडे सुमारे 40 आमदार असून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचे 10 ते 15 आमदार जिंकून आले तरी अजित पवारांचे महत्त्व युती आणि आघाडी या दोन्ही बाजूने वाढू शकते. त्यामुळे निवडणुकीनंतर राजकीय ताकद वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊन अजित पवारांकडून अखेरचा पर्याय म्हणून विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा सूत्रांचा दावा आहे.
नक्की वाचा >> 'पुढचा मुख्यमंत्री आपल्या...'; रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' समोर झळकलेल्या बॅनर्सने खळबळ
अजित पवारांच्या पक्षाबरोबर शिंदेंच्या सेनेनं दावा फेटाळला
दरम्यान, ही बातमी समोर आल्यानंतर अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी ही बातमी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. अजित पवारांच्या पक्षाने कधीही महायुतीमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. त्यामुळे आमच्यात काही मतभेद नसल्याने ते दूर करण्याचा प्रश्नच नसल्याचं शिरसाट म्हणाले आहेत. तर दुसरीकडे अमित मिटकरींनी हे वृत्त पूर्णपणे चुकीचं असून जाणीवपूर्वकपणे अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचं म्हटलं आहे.