'पुढचा मुख्यमंत्री आपल्या...'; रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' समोर झळकलेल्या बॅनर्सने खळबळ

Rashmi Thackeray Birthday Banner In Front of Matoshree: वांद्रे येतील ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' समोरचं रश्मी ठाकरेंना शुभेच्छा देणारी ही अनोखी बॅनर्स झळकली

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 23, 2024, 08:44 AM IST
'पुढचा मुख्यमंत्री आपल्या...'; रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' समोर झळकलेल्या बॅनर्सने खळबळ title=
या बॅनरची चर्चा राज्याच्या राजकारणात आहे

Rashmi Thackeray Birthday Banner In Front of Matoshree: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. थेट सक्रीय राजकारणामध्ये रश्मी ठाकरे दिसून येत नसल्या तरी उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये त्यांच्या शब्दाला वजन असून पडद्या मागील प्रमुख व्यक्तींमध्ये रश्मी ठाकरेंचं नाव आवर्जून घेतलं जात. रश्मी ठाकरे अनेक कार्यक्रमांना उद्धव ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेंबरोबर दिसून येतात. अगदी गणपती दर्शन असो किंवा अनंत अंबानींचं लग्न असो रश्मी ठाकरे प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधून घेतात. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच रश्मी ठाकरे चर्चा विषय ठरल्या त्या वांद्रे येथील ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर झळकलेल्या काही बॅनर्समुळे!

बॅनरवर काय?

राज्याच्या राजकारणामधील प्रभावी महिला राजकारण्यांपैकी एक असलेल्या रश्मी ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'मातोश्री'बाहेर झळकावण्यात आलेल्या बॅनर्सवर त्यांचा उल्लेख 'पुढच्या मुख्यमंत्री' अशा आशयाने करण्यात आला आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच असतानाच 'मातोश्री'बाहेर रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रश्मी ठाकरेंचा आज म्हणजेच सोमवारी, 23 सप्टेंबर रोजी वाढदिवस असून त्याच्या पूर्वसंध्येलाच आदित्य ठाकरे प्रमुख असलेल्या युवासेनेकडून देण्यात आलेल्या शुभेच्छांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. वाढदिवसानिमित्ताने मातोश्री परिसरात शुभेच्छांचे पोस्टर्स लावताना रश्मी ठाकरेंचा थेट 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख आहे. ‘पुढचा मुख्यमंत्री, आपल्या परिवाराचाच, त्याचे प्रतिबिंब तुमच्यात ही दिसते’, असा उल्लेख बॅनर्सवर दिसून येत आहे. रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटोही या बॅनर्सवर आहेत.

काही दिवसांपूर्वीच पहिल्या मुख्यमंत्री म्हणून रश्मी ठाकरेंचा झालेला उल्लेख

काही दिवसांपूर्वीच, एखादी महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली तर आनंद होईल, असं विधान काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलं होतं. "अनेक महिला सक्षम आहेत. सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांच्यासहीत काँग्रेसमध्येही काही महिला या पदासाठी सक्षम आहेत," असा दावा वर्षा गायकवाड यांनी केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पहिली महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळेल अशी चर्चा आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर खरंच राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल का? असा सवाल वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी, "मी महिला म्हणून माझं मत मांडतेय. मी कालसुद्धा तीच भूमिका मांडली, की महिला म्हणून नक्कीच आम्हाला आमचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. प्रत्येक पक्षामध्ये सक्षम महिला आहेत. काँग्रेसमध्ये आम्ही पाच-सहा जणी आहोत ज्या चांगलं काम करतोय. सुप्रियाताई त्यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत. रश्मीताई त्यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत," असं सांगितलं होतं.

नंतर ठाकरेंच्या पक्षाकडून सारवासारव

मात्र या विधानानंतर मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रश्मी ठाकरे सक्रीय राजाकारणामध्ये येण्यात उत्सुक नसल्याचं म्हटलं होतं. "रश्मी ठाकरेंना राजकारणात रस नाही. त्या फक्त त्यांच्या पतीच्या सोबत असतात. महिला मुख्यमंत्री व्हायरल पाहिजेत, पण कारण नसताना रश्मी वहिनींचं नाव असता कामा नये," असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या. असं असतानाच आता पुन्हा रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसाच्या आधीच्या रात्री त्यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख करणारे बॅनर्स 'मातोश्री'समोरच झळकल्याने पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.