शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तब
Mahayuti Seat Sharing: महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडणार भाजपा यासंदर्भातील एक आकडा समोर आला आहे.
Mahayuti Seat Sharing: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावर शिक्कामार्तेब झाल्याचं मानलं जात. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या बैठकींचं सत्र, आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांनंतर अखेर या तिन्ही पक्षांचं जागा वाटपावर एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. जागावाटपामध्ये काय ठरल्याची चर्चा आहे हे जाणून घेऊयात.
भाजपा किती जागा लढणार?
महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच भाजपा स्वतः 150 ते 155 जागा लढण्यावर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे. तर भाजपा शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी एकूण 130 ते 135 जागा सोडण्यास तयार असल्याचं समजतं. सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपासाठी डेंजर झोनमध्ये असलेल्या जागांची जबाबदारी मोठया नेत्यांवर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मित्रपक्षांशी समन्वय, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि निवडणुकीच्या तयारीबाबत कोअर कमिटी बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
अमित शाह दोन दिवस
दरम्यान, दुसरीकडे आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शाह आज सायंकाळी 6:15 वाजता छत्रपती संभाजी नगर विमानतळावर दाखल होतील. एका कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर रात्री 8:35 वाजता ते मुक्कामी असलेल्या हॉटेल रामा येथे पक्षाचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार रावसाहेब दानवे, विधान परिषदेच्या खासदार पंकजा मुंडे उपस्थित असणार आहेत. यानंतर भाजपची मतदारसंघनिहाय आढावा बैठकीनंतर महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे. संभाजी नगरातील या बैठकीला अमित शाहांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील.
शाह यांचे मिशन महाराष्ट्र
भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाची संघटनात्मक बैठक घेणार आहे. लोकसभेत विदर्भातून कमी जागा मिळाल्या असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक पाहता कार्यकर्त्यांना कानमंत्र तर काहींची कानउघडणी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आज सुरेश भट सभागृहात होणाऱ्या बैठकीत विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांची पक्षसंघटनात्मक बैठक होणार आहे. 2014 मध्ये विधानसभेत 44 जागा आणि 2019 मध्ये घसरून 29 जगा जिंकल्या होत्या. सध्याची परिस्थिती पाहता यात घट न होता जागा वाढवण्यासाठी, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करत रणनीती आखली जाणार आहे. यात विधानसभा संयोजक, विधानसभा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, आजी- माजी आमदार यांसह प्रमुख पदाधिकारी या बैठकीत असणार आहे. सुमारे 1500 पदाधिकारी या बैठकीत असणार अशी माहिती आहे. यासह काही प्रमुख पदाधिकारी यांचीही बैठक होईल अशी चर्चा आहे.