`...ही चूक आहे का?` शरद पवारांचा थेट नाव घेत CM फडणवीसांना संतप्त सवाल
Sharad Pawar Slams CM Devendra Fadnavis: शरद पवारांनी जयंत पाटलांसहीत आज मारकडवाडीचा दौरा केला. यावेळेस त्यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा आवर्जून उल्लेख केल्याचं दिसून आलं.
Sharad Pawar Slams CM Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इलेक्ट्रीक मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएमविरोधात आवाज उठवणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीला आज ज्येष्ठे खासदार आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांनी भेट दिली. यावेळेस त्यांनी या गावाची सध्या भारतभर चर्चा असल्याचं म्हणत मारकडवाडीकरांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. यावेळेस शरद पवारांनी केलेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांनी ईव्हीएमसंदर्भात शंका उपस्थित करणारी प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर फडणवीसांनी सोशल मीडियावरुन पवारांचं म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला. त्यावरुनच आता पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
पवारांचा फडणवीसांना थेट सवाल
या भेटीदरम्यान शरद पवारांनी या गावातील गावकऱ्यांचं त्यांच्या भूमिकेसाठी कौतुक केलं. "काल ईव्हीएमसंदर्भात मी बोललो तर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. पवार साहेबांनी ही करणं देणं योग्य नाहीत. काय चुकीचं केलं मी? तुमच्या गावी येणं चुकीचं आहे का? काही पद्धती बद्दल लोकांच्या मनात शंका आली त्याची माहिती घेऊन निरसन करण्याबद्दलचे काळजी घेणं चूक आहे का?" असा टोला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. "मुख्यमंत्र्यांना विनंती आम्हाला यात राजकारण आणायचं नाही इथे जे घडलं ते माहिती घेणे त्यांची शंका दूर करणे काम आहे. यात कसलंही राजकारण करायचं नाही," अस शरद पवार मारकडवाडीकरांसमोर दिलेल्या भाषणात म्हणाले.
सत्ताधाऱ्यांना आवाहन
मारकडवाडीकरांना आवाहन करताना शरद पवारांनी गावकऱ्यांना ईव्हीएमऐवजी मत पेटीत मतदान घेण्याचा ठराव मांडण्यास सांगितलं. "ठराव करा सगळी माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ," असं शरद पवार म्हणाले. सत्ताधाऱ्यांना आवाहन करताना शरद पवारांनी, "शक्य झालं तर येथे येऊन या लोकांचं काय म्हणणं आहे ते ऐका. त्याच्या मनात असेल तर दुरुस्ती करा," असंही म्हटलं.
नक्की वाचा >> 'EVM बद्दलची शंका घालवायची असेल तर...'; मारकडवाडीकरांसमोर शरद पवारांचं वक्तव्य
"मी संसदेत जाऊन तुमच्या गावात काय चर्चा झाली हे तुमच्या वतीने मांडेन. जानकर यांना काही दिवस झोप नाही. ही शंका दूर झाल्याचे आमचा जानकर घरी स्वस्थ बसणार नाही. तुम्ही त्याला स्वस्थ बसू द्यायचं नाही. मी इथे लोकसभेला होतो. तुम्ही मला मत दिले मी मत मागायला न येता सुद्धा तुम्ही मला मतं दिली. त्यावेळी मत दिली आज मी त्याचे आभार मानतो," असं शरद पवार म्हणाले.