विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार पडलं असतं का? नाना पटोलेनी स्पष्टच सांगितलं...
Nana Patole Jahir Sabha: झी 24 तासच्या विधानसभा निवडणूक विशेष कार्यक्रमाची सुरुवात काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या मुलाखतीने झाली
Nana Patole Jahir Sabha: झी 24 तासच्या विधानसभा निवडणूक विशेष कार्यक्रमाची सुरुवात काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या मुलाखतीने झाली. या 'जाहीर सभा' कार्यक्रमात नाना पटोले यांनी सर्व प्रश्नांची आपल्या खास शैलीत उत्तरे दिली. राज्यात शिवद्रोही सरकार आहे. राज्यात महिला,शेतकरी सुरक्षित नाही. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात आम्ही लढतोय. हेच मुद्दे घेऊन आम्ही जनतेत जाणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. आमची काँग्रेस पार्टी राष्ट्रीय पार्टी आहे. आमचे साथीदार आहेत ते राज्यातले पक्ष आहेत. निवडणुका जाहीर झाल्या. आमच्या 10 ते 12 मिटींग झाल्या. याचा आम्ही प्रस्ताव तयार केला आणि हायकमांडकडे पाठवतो. आमच्या महाविकास आघाडीत कोणताही तणाव नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात महायुतीतील तणाव दिसून आलाय, हेदेखील त्यांनी आवर्जुन सांगितले.
महाराष्ट्रातील तिजोरी रिकामी आहे. सर्वत्र खडखडाट असल्याची टीका त्यांनी केली.
नाना पटोले बैठकीसाठी असतील तर आम्ही थेट दिल्लीशी चर्चा करु, अशी बातमी समोर आली होती. यात तथ्य नाही. संजय राऊत आणि मी चांगले मित्र आहोत. आमच्यात कोणताच वाद नाही, असे ते म्हणाले.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला नको होता, असे नेहमी म्हटले जाते. यावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, तो मी मान्य करतो. मला जेव्हा राजीनामा द्यायला सांगितलं, तेव्हा मी हसत हसत राजीनामा दिला. माझे एक जवळचे सहकारी जे आता दुसऱ्या पक्षात गेलेयत, त्यांनी त्यावेळी मला सांगितलं होतं, की राजीनामा देऊ नका. असं पद पुन्हा मिळत नाही. मी त्यांनादेखील त्यावेळी सांगितलं की, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो मला मान्य असल्याचे ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष या खुर्चीवर माझा सातबारा लिहिलेला नाही. लोकशाहीत कोणाचा सातबारा नसतो. पुन्हा येईन पुन्हा येईन नसतं. जनतेच्या आशीर्वादावर सर्व असतं. सत्तेत आलेली लोक खोक्याने आली असतील पण आपण त्याला जनतेचा आशीर्वाद म्हणूया. जे सरकार येईल ते जनतेसाठी असेल हे माझं आणि माझ्या पक्षाचं मत आहे.
177 आमदारांचा पाठींबा होता. 145 आमदारांचं बहुमत होतं. आपण बहुमतात होतो. दुसरा अध्यक्ष करता आला असता. पण केंद्रात बसलेल्या मोदी-शहांना लोकशाहीच मान्य नाही. ते कामाला लागलेच होते. मी राहिलो असतो तरी तेच झालं असतं, असेही नाना पटोले म्हणाले. तेव्हा निवडणूक घेतली गेली नाही. अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली तर पक्षाला फटका बसेल, क्रॉस वोटींग होईल? अशी भीती होती का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना काही प्रश्नांची उत्तरे राखून ठेवली आहेत.सर्वच प्रश्नाची उत्तरे लगेच द्यायची नसतात. काही राखून ठेवायची असतात, असे ते म्हणाले.
राज्यातील सरकार पाडायची भूमिका केंद्रातून घेतली. फडणवीस म्हणाले सरकार पाडण्यात माझी भूमिका नाही. पण मिसेस फडणवीसांनी सांगितले की, 'आमचे हे वेश बदलून जायचे'. हे सत्तेशिवाय राहू शकत नाही,अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील कोणत्या नेत्याला समजावणे सोपे आहे? या प्रश्नाला उत्तर देताना तिनही नेते समजदार आहेत, असे ते म्हणाले.