Maharashtra Election Results: `मोदी आहेत तर...`; विजयावर फडणवीसांची 2 वाक्यात पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Vidhan Sabha Election Results Devendra Fadnavis First Comment: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results Devendra Fadnavis First Comment: राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येणार हे मतमोजणीच्या प्राथमिक कलांनंतर स्पष्ट झालं असून महायुतीने विक्रमी जागा जिंकत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. भारतीय जनता पार्टीने तर अभूतपूर्व यश संपादित करत थेट 127 जागांवर आघाडी घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 80 टक्क्यांपेक्षा अधिक स्ट्राइक रेट राखत भाजपाने लढवलेल्या 148 जागांपैकी 127 जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे. असं असतानाच आता सर्वात मोठ्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री होणार या सूत्रानुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या साऱ्यादरम्यान फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) हॅण्डलवरुन नोंदवलं आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये 'एक है तो 'सेफ' है' घोषणा चांगली गाजली होती. याच घोषणेचा उल्लेख महायुती राज्यात सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर फडणवीसांनी केला आहे. "एक है तो ‘सेफ’ है!" असं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यापुढे फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख आपल्या पोस्टमध्ये काल आहे. "मोदी है तो मुमकिन हैं!" असं फडणवीसांनी म्हटलं आहे. म्हणजेच 'मोदी आहेत तर शक्य आहे', असं फडणवीसांचं म्हणणं आहे. फडणवीसांनी आपल्या पोस्टमध्ये #Maharashtra #महाराष्ट्र हे दोन हॅशटॅगही वापरले आहेत.
फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत
दरम्यान, भाजपाचे नेते प्रवीण दरेकरांनी फडणवीस मुख्यमंत्री होतील असं मत व्यक्त केलं आहे. पत्रकारांनी दरेकरांना फडणवीस मुख्यमंत्री होणार का यासंदर्भात विचारलं. त्यावर उत्तर देताना, "मी एक सांगू शकतो की महायुतीचे मुख्यमंत्री होणार. सहाजिक आहे जो पक्ष मोठा असतो त्याला अधिक संधी असते. भाजपा आज 125 च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर फडणवीसच मुख्यमंत्री होतील," असं दरेकरांनी म्हटलं आहे.