Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Deposit Japt: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. राज्यामध्ये पुन्हा एकनाथ शिंदेंची शिवसेना, भारतीय जनता पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुती सत्तेत येणार की उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता ताब्यात घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज निकाल जाहीर होताना अनेक ठिकाणी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं असं ऐकायला मिळतं. मात्र डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय? नेमके किती पैसे जप्त होतात? यामागील लॉजिक काय असतं हे अनेकांना ठाऊक नसतं. याचसंदर्भात आज निकालाच्या निमित्ताने जाणून घेऊयात...


डिपॉझिट भरण्याचा कायदा काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकप्रतिनिधी कायदा, 1951 नुसार जी व्यक्ती उमेदवार म्हणून लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी उभी राहत असेल तर त्या व्यक्तीला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम जमा करावी लागते. याच रक्कमेला डिपॉझिट असं म्हणतात. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ही रक्कम वेगवेगळी असते. अगदी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकासाठी उभं राहायलाही त्या उमेदवाराला डिपॉझिट भरावं लागतं. कोण किती पैसे डिपॉझिट म्हणून भरतं हे पाहूयात...


कोणाला किती पैसे भरावे लागतात?


राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभं राहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 15 हजार रुपयांची रक्कम भरावी लागते. यामध्ये प्रवर्गानुसार कोणतीही सूट दिली जात नाही.


लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीत उभं राहण्यासाठी निवडणूक आयोगाकडे 25 हजार रुपये जमा कलावे लागतात. एसटी आणि एससी श्रेणीमधील उमेदवारांसाठी ही रक्कम 12,500 रुपये इतकी आहे.


विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करताना 10 हजार रुपये डिपॉझिट म्हणून भरावी लागते. प्रवर्गासाठी ही रक्कम 5 हजार इतकी आहे.


नक्की वाचा >> शिंदे, फडणवीस, पवार, ठाकरेच नाही तर 'ही' नावंही CM पदाच्या शर्यतीत; शेवटचं नाव पाहाच


कधी जप्त होतं डिपॉझिट?


केंद्रीय निवडणूक आयोग उमेदवारांकडून डिपॉझिट घेऊन ती रक्कम जमा करुन घेतो. त्यानंतर ठराविक प्रमाणात मतं न मिळाल्यास डिपॉझिट जप्त होतं. म्हणजेच भरलेली रक्कम परत केली जात नाही. प्रत्येक एकूण मतदानाच्या 16.66 टक्के मतं मिळवणं आवश्यक असतं. असं न झाल्यास डिपॉझिट जप्त केलं जातं. म्हणजेच 1 लाख मतदारांचा मतदारसंघ असेल तर उमेदवाराला 16 हजार 660 किंवा त्याहून अधिक मतं मिळाली तरच त्यांना डिपॉझिट परत केलं जातं. तसं न झाल्यास त्यांना भरलेले पैसे परत मिळत नाहीत. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये किमान 1/6 मतं मिळवणाऱ्यांचं डिपॉझिट जप्त होतं नाही.


कोणाला परत मिळते रक्कम?


याउलट 1/6 टक्के मतं मिळवणाऱ्या उमेदवाराला डिपॉझिटची रक्कम परत केली जाते. तसेच विजेत्या उमेदवारालाही त्याच्या डिपॉझिटची रक्कम परत केली जाते. तसेच अर्ज मागे घेणाऱ्यांनाही त्यांनी भरलेली रक्कम परत केली जाते.