Sanjay Raut On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. बुधवारी ठाण्यातील घरी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहांकडे दिल्याच्या मुद्द्यावरुन राऊतांनी निशाणी साधला आहे. जर स्वत:ला शिवसेना म्हणवणारे आपल्या पक्षाचा निर्णय दिल्लीकडे सोपवत असतील तर त्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच नाव यापुढे घेऊ नये असा टोला राऊतांनी लगावला आहे.


...तर राष्ट्रपती राजवट लावून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री ठरवण्यासाठी होत असलेल्या विलंबावरुन निशाणा साधला. "200 पेक्षा जास्त जागा जिंकलेल्या युतीला मुख्यमंत्री ठरवता येत नाही. भाजपाला जवळपास पूर्ण बहुमत असतानाही महाराष्ट्रचं मुख्यमंत्रिपद असं का लटकून पडलं आहे हे जनतेला कळत नाही. जनतेला त्यात इन्ट्रेस्ट नाही. कारण हा जनतेचा कौल नाही. हा जनतेचा कौल आम्ही मानत नाही. तीन पक्षांना पाशवी बहुमत असताना अशी परिस्थिती आहे. विधानसभेची मुदत 26 तारखेला संपली आहे. या ठिकाणी आम्ही असतो तर राष्ट्रपती राजवट लावून ऐव्हाना आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं असतं. मात्र नियम कायदे फक्त विरोधीपक्षासाठी आहेत. बहुमत प्राप्त झालेल्या महायुतीला कोणताही नियम नाही. महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी मिळेल, कोण मिळेल आम्ही सगळेच वाट पाहत आहोत," असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.


शिंदेंनी सर्व अधिकार दिल्लीला दिल्यावरुन टोला...


शिंदेनी सर्व अधिकार दिल्लीकडे सोपवल्याचा उल्लेख करत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊतांनी, 'प्रश्न असा आहे की त्यांचा असा दावा कसा असू शकतो?' असा सवाल उपस्थित केला. "जे स्वत:ला शिवसेना मानतात त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीतील मोदी-शाहांना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेबांचं नाव घेऊ नये. जर शिवसेना निवडणूक आयोगाने तुमच्या हातात दिलेली आहे. त्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार मोदी-शाहांना देत असाल तर तुम्ही बाळासाहेबांचा स्वाभिमान, अभिमान असं बोलू नका," असा टोला राऊतांनी लगावला आहे.


नक्की वाचा >> पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना झापलं! म्हणाले, 'माझा पक्ष, माझे वडील अजित पवार कोणत्याही...'


मुख्यमंत्रिपदासंदर्भात विचारण्यात आलं असता राऊतांनी, "ज्यांच्याकडे बहुमत ते मुख्यमंत्री ठरवतील. त्यांच्या युतीमधील दोन पक्षांनी दोन अधिकार दिल्लीला दिले आहेत. दिल्ली ठरवेल महाराष्ट्रचं भविष्य," असं उत्तर दिलं.