लक्ष द्या! 19 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालक संभ्रमात, शिक्षक म्हणतात...
Maharashtra Vidhan Sabha Election : शाळांना सुट्टी आहे की नाही? पालक संभ्रमात... शिक्षण विभागानं काय म्हटलंय पाहाच
Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी काही तास उरलेले असतानाच राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच राज्यातील शाळांना सुट्टी असणार की नाही, यावरून पालकवर्ग संभ्रमात असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील शाळांना मतदानाच्या दोन दिवस आधी सुट्टी असल्याच्या मुद्द्यावरुन संभ्रम असतानाच आणखी एका पत्रकानं यात भर टाकल्याचं पाहायला मिळत आहे.
शाळेतील सर्व शिक्षकांना निवडणूक कामांसाठी नियुक्त केल्यास नजीकच्या शाळेतील शिक्षकांची निवड करून 18, 19 नोव्हेंबरला शाळा सुरु ठेवण्याची सूचना शिक्षण आयुक्तालयानं जारी केली. प्रत्यक्षात मतदान केंद्र असणाऱ्या मुंबई पालिकेच्या शाळांना मात्र 19 नोव्हेंबरला सुट्टी असेल. एका प्रतिष्ठीत माध्यमाशी संवाद साधताना भूषण गगराणी यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
निवडणुकीच्या धर्तीवर राज्यातील शाळांच्या व्यवस्थापनासंदर्भात आता नव्या पत्रकानं नवा संभ्रम निर्माण केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा 18- 19 नोव्हेंबर रोजी सुरू राहणार असून, मुख्याध्यापकांच्या मदतीनं याचं नियोजन गटशिक्षणअधिकाऱ्यांनी करावं असं आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागदपत्र आणि मतदान यंत्र जमा करेपर्यंतच्या एकूण कामासाठी साधारण 40 ते 45 तासांचा कालावधी जातो.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : पावसानं पूर्ण माघार घेताच राज्यात थंडीचा कडाका वाढला; एका रात्रीत तापमानात 'इतकी' घट
अशा परिस्थितीमध्ये अनेकदा मतदान केंद्रांनजीकच या मतदान कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मंडळींना / शिक्षकांना मुक्काम ठोकावा लागत असल्यामुळं मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शाळा गाठणं अनेकांनाच शक्य होत नाही.ज्यामुळं 21 तारखेच्या दिवसाची गणती कर्तव्याचा दिवस म्हणून करत शिक्षकांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी शाळा आणि शिक्षकांच्या वतीनं करण्यात येत आहे.