Shivsena MLA Santosh Bangar: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भर सभेत केलेल्या विधानामुळे ते वादात सापडले आहेत. 'फोन पे करतोच' असं वक्तव्य आमदार बांगर यांनी केलं होतं. त्यामुळे आमदार बांगर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या विधानाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. काय आहे प्रकार? जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच आपल्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. आपल्या रोखठोक भूमिकेमुळे अनेकदा त्यांना अडचणींचा सामना करावा लागलाय. त्यात आता आणखी एकाची भर पडलीय. बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसांमध्ये द्यावी, त्यांना सांगा गाड्या करा, गाड्यांसाठी जे काही लागतं ते त्यांना फोन पे करतो, त्यांना सांगा येण्या-जाण्याचा जे काही लागते ते आम्हाला सांगा, अस आर्थिक प्रलोभन देणार वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केल्याने खळबळ उडालीय. हिंगोलीच्या कळमनुरी येथे आमदार संतोष बांगर यांनी एका कार्यक्रमात हे विधान केलं आहे. 


ठाकरेंच्या शिवसेनेकडून तक्रार 


आमदार संतोष बांगर हे येत्या 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज शिवसेना शिंदे गटाकडून दाखल करणार आहे.कळमनुरी मध्ये आयोजित एका कार्यक्रमांमध्ये आमदार बांगर यांनी मतदारांना आणण्यासाठी फोन पे ने पाठवा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. आमदार बांगर यांनी मतदारांना पैशाचं प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी केली आहे. 


निवडणूक विभागाच्यावतीने आमदार संतोष बांगर यांना त्या वक्तव्याचा खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पुढील 24 तासांमध्ये आमदार बांगर यांनी खुलासा सादर करावा असं त्या नोटीसमध्ये म्हटलं आहे. 


निवडणूक आयोग तपासणार व्हिडीओ 


संतोष बांगर यांच्या वादरग्रस्त विधानाचा व्हिडिओ निवडणूक विभागाच्यावतीने तपासला जातोय. याप्रकरणी लवकरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आमदार बांगर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी  केली आहे.