Maharashtra Weather Alert: राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान वाढल्यामुळं त्याचा परिणाम राज्यातही दिसून येत आहे. आणखी काही दिवस राज्यातला गारठा कायम राहणार आहे. तरी किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळं काही ठिकाणी अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण अंदमान समुद्रात आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार असून सोमवारपर्यंत या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. यातच पश्चिमी चक्रावात आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात मात्र गारठा कायम असला तरी किमान तापमानात हळहळू वाढ होत आहे. दोन दिवसांत किमान तापमानात हळूहळू 2-3 अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे.


अवकाळी पावसाची शक्यता


बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. रविवारपासून ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण जास्त काळ राहू शकते. त्यामुळं रविवारपासून पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात वाढ होऊ शकते. त्यामुळं ऐन डिसेंबरमध्ये नागरिकांना पाऊस आणि उष्णता या दोन्हींचा सामना करावा लागू शकतो. 


शुक्रवारी 24 तासांमध्ये धुळे 6, परभणी 8.5, जळगाव 8.9 आणि गडचिरोली 10 अशी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर, निफाडचा पारा 11 अंश सेल्सिअसवर कायम आहे. त्यामुळं निफाडसह परिसरात थंडी कायम आहे.