मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra Rain IMD Update : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प आहे. तसेच अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक संथगतीने आहे. नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्येही मुसळधार पाऊस आहे. आज पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस
मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस सुरू आहे. मुंबईवर दाट ढगांची दाटी झाली आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. उशिरा दाखल झालेल्या मान्सूनची मुंबई आणि उपनगरांमध्ये दमदार हजेरी दिसून येत आहे. जूनच्या सरासरीतील 90 टक्के पाऊस गेल्या 6 दिवसांत पडला आहे. कोकणातही चांगला पाऊस पडत आहे. रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावर नाणीज येथे रस्ता खचला आहे. याठिकाणी दोन गाड्या रुतल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे.
पश्चिम उपनगरात पाणी साचल्यामुळे अंधेरी सब वे बंद झाला होता. मात्र काही वेळाने पाण्याचा निचरा झाल्यावर पुन्हा वाहतूक सुरु झालीय. माहीम, वांद्रे अंधेरी, पार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली भागात रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. तर पूर्व उपनगरात दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या भागात पाऊस सुरू आहे. मुंबईलगत असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याण डोंबिवली भागात मध्यरात्रीपासून वादळी वारे आणि पाऊस सुरु आहे. नवी मुंबईतही ऐरोलीपासून खारघरपर्यंत विविध भागात पाऊस कोसळत आहे.
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. खेड शिवापूर - वरवे, वेळू, शिंदेवाडी रस्त्यावर पाणीचपाणी झालंय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि खेड-शिवापूर टोलनाका ठेकेदार यांच्या संथ गतीच्या कामांमुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. महामार्गावरही पाणीचपाणी झाल्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. महामार्गावर अनेक गाड्या बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यापूर्वीच पाणी वाहून नेणा-या नाल्यांची सफाई होणं गरजेचं होतं, मात्र हे काम झालंच नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणीचपाणी दिसून येतंय. पहिल्याच पावसात रस्त्याची ही अवस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दमदार पाऊस
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने पेरणीची लगबग सुरू झालीये. पहिल्याच पावसानंतर आता कृषी केंद्रांवरही खतं आणि बियाणं खरेदी करण्यासाठी शेतक-यांची गर्दी दिसून येतेय. मात्र काही भागात पाऊस कमी झालाय. त्यामुळे त्या भागाती शेतक-यांनी पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय.