Maharashtra weather News : उत्तर भारतातील राज्यांमध्ये सुरु असणारा थंडीचा कडाका आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला असून, येत्या 48 तासांमध्ये हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. थोडक्यात लागून आलेल्या सुट्टीच्या निमित्तानं एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जायच्या विचारात असाल, तर हवामान तुमच्या सहलीला आणि सुट्टीचा चार चाँद लावून जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला राज्याच्या निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, इथं तापमानाचा आकडा 4.5 अंशांवर पोहोचला आहे. तर मध्य मराहाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्येही काही जिल्ह्यांचं तापमान 10 अंशांहून कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 


हेसुद्धा वाचा : ज्ञानवापीमध्ये मोठं हिंदू मंदिर, तळघरात देवी-देवता...; ASIच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये मोठा खुलासा


 


पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा आकडा मोठ्या फरकानं खाली गेला असून, पुणे आणि साताऱ्याच्या डोंगराळ भागांमध्ये कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. तिथं नाशिक, नगर, नागपूर आणि यवतमाळमध्येही रात्रीच्या वेळी तापमानाचा आकडा 5 अंशांपर्यंत उतरल्याचं सांगण्यात आलं होतं. राज्यात वाढणारा थंडीचा कडाका पाहता महाबळेश्वर आणि लोणावळा, इगरतपुरी यांसारख्या ठिकाणांवर पर्यटरकांची गर्दी वाढताना दिसत आहे. 


तुम्हीही जर लोणावळा आणि इगतपुरी किंवा पाचगणी, महाबशळेश्वर या ठिकाणांना भेट देणार असाल तर गार वारे तुमच्याही सहलीचा आनंद द्विगुणीत करताना दिसणार आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. 



अखेर काश्मीरनं पाहिला बर्फ... 


यंदाच्या हिवाळ्यामध्ये काश्मीर भागामध्ये अपेक्षित हिमवृष्टी न झाल्यामुळं वातावरण बदलांचे गंभीर परिणाम पाहायला मिळाले. पण, अखेर हे दिवसही पालटले असून, अखेर काश्मीरमधील गुरेझ खोऱ्यामध्ये हिमवृष्टी झाली आणि संपूर्ण परिसरावर बर्फाची चादर पाहायला मिळाली. सध्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार असून, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानपर्यंत त्याचे परिणाम दिसून येणार आहे. शिवाय या भागांमध्ये दाट धुक्याची चादर असल्यामुळं येथील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवरही याचे परिणाम नाकारता येत नाहीत.