Maharashtra Weather Updates : यंदाच्या वर्षी मान्सूनचा (Monsoon) प्रवासच उशिरानं सुरु होणार असल्यामुळं परिणामी त्याचं महाराष्ट्रात होणारं आगमनही लांबणीवर पडल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) देण्यात आली. स्कायमेट (Skymet) या खासगी संस्थेनंही असंच काहीसं निरीक्षण नोंदवलं, ज्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्याही चिंतेत भर पडली. इतकंच नव्हे, तर सुट्टीच्या दिवसांमध्ये एखाद्या ठिकाणी पर्यटनासाठी निघणाऱ्या मंडळींच्याही आनंदावर हा उकाडा विरजण टाकत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील साधारण दोन महिन्यांपासून राज्यात अवकाळीनं धुमाकूळ घातला. या अवकाळीच्या फेऱ्यानं काढता पाय घेतला नाही तोच एकाएकी राज्यातील तापमानात वाढ होत असल्याची बाब नोंदवली गेली. पुणे, विदर्भ, सोलापूर पट्ट्यामध्ये पारा 38 ते 40 अंश आणि त्याहूनही जास्त असल्याचं पाहिलं गेलं. त्यातच 17 मे नंतर राज्यात उकाडा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिल्यामुळं आता ही परिस्थिती नेमकी किती दिवस टिकून राहणार याचीच नागरिकांना चिंता लागून राहिलीये. 


मुंबई, कोकणात उकाडा वाढला... 


मुंबई आणि कोकण (Mumbai and Konkan) पट्ट्यामध्ये वाढत्या तापमानासोबतच आर्द्रतेचं प्रमाणही जास्त असल्यामुळं उष्णतेचा दाह जाणवण्याचं प्रमाणही अधिक असेल. परिणामी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्लाही नागरिकांना देण्यात येत आहे. गुरुवारी राज्यातील तापमानाचा आढावा घ्यायचा झाल्यास बहुतांश भागांमध्ये पारा 39 अंशांच्या पलिकडे गेल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील कोरेगाव पार्क येथे तापमान 42 अंशांच्याही पलीकडे पोहोचलं होतं. 


पश्चिमी झंझावात आणि तापमान वाढ.... 


देश स्तरावर सध्याच्या घडीला पश्चिमी झंझावात सक्रीय असला तरीही तापमान वाढीपासून नागरिकांची सुटका होणार नाहीये. असं असलं तरही याच्या परिणामस्वरुप हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, हिमाचल आणि पंजाबसह नजीकच्या भागामध्ये तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. 


हेसुद्धा वाचा : Alert : पुढील 5 वर्षांत जगभरातील तापमान मोठ्या फरकानं वाढणार; तुमच्या भवितव्याला उष्णतेच्या झळा


 


सततचा वाढचा उकाडा पाहता, या आठवड्यात त्यापासून सुटका होणार नसली तरीही पुढच्या आठवड्यात मात्र तापमानात घट पाहिली जाऊ शकते. शिवाय एक नवा पश्चिमी झंझावात हिमालय पर्तवरांगेच्या पट्ट्यावर सक्रीय होत असल्यामुळं 22 ते 28 मे दरम्यान देशातील बहुतांश भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असू शकते. 


सध्याच्या घडीला बरसणारा पाऊस मान्सून नाही, याची मात्र नोंद घ्यावी. कारण, मान्सून वाऱ्यांचा प्रवास अंदमानपासून सुरू होऊन पुढे साधारण 4 जूनच्या दरम्यान केरळातून पुढे सरकेल. महाराष्ट्रात हे वारे 9 जूनपर्यंत पोहोचतील  आणि मुंबईत मान्सून 14 - 15 जून रोजी हजेरी लावेल अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.