Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?
Maharashtra Weather Forecast : फेब्रुवारीत उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्यामुळं मार्च ते जून मध्ये नेमकी काय परिस्थिती असेल या विचारानं सर्वच हैराण.
Maharashtra Weather Forecast : देशातील हवामानात होणारे बदल, पश्चिमी झंझावाताचा कमी झालेला वेग अशी एकंदर परिस्थिती पाहता फेब्रुवारी (February) महिन्यातच तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. राजस्थान, हरियाणा, (Himachal Pradesh) हिमाचलमध्येही आता थंडीचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेलं असून, महाराष्ट्रातही याचे परिणाम दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात ऐन फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
अकोल्यात (Akola) दिवसा 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षातील कमाल तापमानाचा हा उच्चांक ठरत आहे. तर, नागपुरातही पारा 38 अंशांवर गेला आहे. सकाळच्या वेळी उष्णता आणि रात्री थंडी असं चित्र सध्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. फेब्रुवारीपासूनच सुरु झालेला हा उन्हाळा आता ऐन मार्च ते जून या काळात कसा असेल याच विचारानं अनेकांना घाम फुटू लागला आहे. दरम्यान पुढील चार दिवस (Nagpur) नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत तापमान 40 अंशांच्याही पलीकडे जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
कोकणवासियांसाठीही इशारा...
पुढील दोन दिवस कोकणात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या धर्तीवर इथं तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या घरात राहण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागांत तापमानाचा आकडा वाढतच असेल. त्यातच आकाश निरभ्र असल्यामुळं इथं सूर्यकिरणांमुळं जाणवणारी उष्णता तुलनेनं अधिक असेल.
पिकांवरही उन्हाळ्याचा परिणाम...
दिवसागणिक सातत्यानं वाढत्या उन्हाचा परिणाम शेतमालावरही होताना दिसत आहे. जिथं रब्बी पीक आणि भाजीपाल्याचं नुकसान होताना दिसत आहे. तापमानात एकाएकी 3 ते 4 अंशांनी वाढ झाल्यामुळं हरभऱ्याची फुलंही गळून पडली आहेत. तर, गव्हाच्या ओंब्याही करपू लागल्या आहेत. ज्यामुळं येत्या काळात या गोष्टींच्या किमतीही वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान विदर्भात तापमानाच झालेली वाढ पाहता येथील कोणत्या जिल्ह्यात नेमकं किती तापमान हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं. त्यामुळं गरज नसल्यास दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नका. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यावर भर द्या.