Maharashtra Weather : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पाहायला मिळालेल्या हवामानाचं चित्र अद्यापही बदलू शकलेलं नाही. राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अवकाळीचं संकट थैमान घालताना दिसत आहे. जिथं, मुसळधार पावसामुळं पुन्हा पिकांचं नुकसान झाल्यामुळं आता बळीराजा हवालदिल झाला आहे. 


बुधवारी कुठे  पाहायला मिळालं अवकाळीचं थैमान? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी वाशिममध्ये वादळी वारा आणि गारपिटीमुळं बाजरी, काढणीला आलेली हळद, मूग, टोमॅटो या पिकांचं मोठं नुकसान झालं. तर, जालन्यातील माळशेंद्रा परिसरात अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली. तर, परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार गारपीट झाली. मानवत तालुक्याला वादळी वाऱ्यासोबतच पावसानंही हजेरी लावल्यामुळं नागरिकांच्या अडचणी वाढल्या.  


पुर्णा तालुक्यात शेतात कांदे झाकत असताना विठ्ठल कोकरे नावाच्या एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आणि या अवकाळीनं आणखी एक बळी घेतला. तिथे जळगावातही परिस्थिती वेगळी नव्हती. भुसावळमधी वेल्हाळे शिवारातही पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळं अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. 


तापमानात घट होणार? 


भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीच्या वृत्तानुसार 28 एप्रिलपासून देशात पुन्हा एकदा तापमानात काही अंशांची घट नोंदवली जाणार आहे. ज्यामुळं दक्षिणेपासून पश्चिमेपर्यंत आणि पूर्वेपर्यंतही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तर, काही भागांना गारपीटीचा मारा सोसावा लागणार आहे. 


स्कायमेटच्या (Skymet) अंदाजानुसारही विदर्भ आणि नजीकच्या परिसरावर चक्रीवादळसदृश परिस्थिती तयार होताना दिसत आहे. ज्यामुळं दक्षिणेला कर्नाटक किनारपट्टीच्या अंतर्गत भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसत आहे. परिणामस्वरुप उष्णतेची तीव्रता काही अंशी कमी झाल्याचं जाणवू लागलं आहे. 


हेसुद्धा वाचा : उन्हाळ्यात कॉफी पिणं कितपत चांगलं? जाणून घ्या आरोग्याला होणारे धोके


हवामानात झालेल्या या बदलांमुळं मागील 24 तासांमध्ये दक्षिण आसामच्या काही भागांमध्ये पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली. तर, ओडिशा, झारखंड, छत्तीसगढ, दक्षिण पूर्व मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ, हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि बिहार भागात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. 


पुढील 24 तासांमध्ये हिमालयाच्या पश्चिम भागात हलक्या ते जोरदार स्वरुपातील पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मोठमोठ्या गारांचा माराही होऊ शकतो असा अंदाज आहे. काश्मीरचं खोरं, हिमाचलचा पर्वतीय भाग, उत्तराखंडचा पर्वतीय या भागात दरम्यानच्या काळात बर्फवृष्टी होऊ शकते. याचे परिणाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाहायला मिळणार असून, तापमानात किमान 3 अंशांनी घट होऊ शकते.