Weather Update : राज्यातील कमाल तापमान 40 अंशांवर; तरीही `या` भागात मात्र पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : राज्यात एकिकडे उन्हाळा अधिकाधिक तीव्र होताना दिसत असला तरीही दुसरीकडे मात्र ढगाळ वातावरणासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update : मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासूनच राज्यामध्ये उकाडा वाढत असल्याची बाब लक्षात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत तापमानाचा आकडा उच्चांक गाठत असतानाच आता हा उन्हाळा पुढं आणखी त्रासदायक ठरणार असंच चित्र स्पष्टपणे दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यातील कमाल तापमानानं 40 अंश सेल्सिअसचा आकडा ओलांडला असून, या उन्हाच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान एकिकडे उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे मात्र पावसाच्या हलक्या सरींची शक्यता येत्या काही दिवसांसाठी वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार अमरावती, गडचिरोली, नागपूर, गोंदिया या भागांमध्ये पुढच्या तीन ते चार दिवसांसाठी ढगाळ वातावरणासह पावसाच्या तुरळक सरींची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मात्र यास अपवाद ठरणार आहे. कारण, या भागांमधील हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, सध्यातरी शेतकरी आणि बागायतदारांनी चिंता वाटून घेऊ नये
असंही सांगण्यात येत आहे.
आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय
सध्या देश पातळीवर हवामानाचा अंदाज घ्यायचा झाल्यास ओडिशापासून छत्तीसगढ, तेलंगणा आणि कर्नाटकापासून पूर्ण मध्य अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी या प्रणालीचे परिणाम विदर्भातील हवामान आणि ढगाळ वातावरणाच्या रुपात दिसून येत आहेत. सध्याच्या घडीला उकाडा इतका वाढला आहे की दुपारच्या वेळी ठाणे, मुंबई, पालघर आणि नवी मुंबईसह कोकण किनारपट्टी भागामध्ये उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होताना दिसत आहेत. किनारपट्टी क्षेत्रांतील हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढत असल्यामुळं ही स्थिती निर्माण झाली असून, पुढील बरेच दिवस यामध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही.
हेसुद्धा वाचा : पंकजा मुंडेंचा वनवास संपला, लोकसभा निवडणुकीसाठी 'या' मतदारसंघातून उमेदवारी जाहीर
राज्याच्या विविध भागांतील तापमान
पुणे 37.3 अंश सेल्सिअस
कोल्हापूर 37.7 अंश सेल्सिअस
नाशिक 35.3 अंश सेल्सिअस
सातारा 37.7 अंश सेल्सिअस
मुंबई 36 अंश सेल्सिअस
रत्नागिरी 33.6 अंश सेल्सिअस
नागपूर 38.5 अंश सेल्सिअस