Weather Updates : पावसाळी ढगांनी पळवली राज्यातील थंडी; पाहा कुठं बसणार अवकाळीचा तडाखा
Weather Updates : देशाच्या उत्तरेकडील काही भाग वगळता बहुतांश भागांमध्ये थंडीनं दडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे आजचा हवामान अंदाज...
Weather Updates : हिवाळ्याच्या ऋतू देशातील बहुतांश राज्यांवर पकड घट्ट करतो त्याच काळात यंदाच्या वर्षी मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरताहेत अल निनोचा परिणाम आणि सक्रिय असणारा पश्चिमी झंझावात.
सध्याच्या घडीला महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून, तयामुळं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाच्या तुरळक सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळं होती नव्हती ती थंडीसुद्धा आता कमी होणार असून, पावसाळी ढगांचं सावट मुंबईपासून नवी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड पट्ट्यावर पाहायला मिळणार आहे.
काय आहे हवामानाचा अंदाज?
हवामान विभागाच्या माहितीनुसार गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर, पश्चिमी झंझावात अर्थात एक थंड हवेचा प्रवाह हरियाणामध्ये सक्रीय आहे. परिणामी आग्नेयकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येत असल्यामुळं हे पावसाळी वातावरण तयार झालं आहे. ज्यामुळं पुढील 48 तासांत उत्तर महाराष्ट्र, विदर्भात थंडी वाढेल, तर मध्य महाराष्ट्र, कोकण पट्ट्याला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
कोकणाला तडाखा, साताऱ्यात धुक्याची चादर
मागील दोन दिवसांपासून रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. शिवाय इथं तापमानातही काही अंशांची वाढ नोंदवण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीनंतर इथं पावसानं जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि पावसाचा मारा यामुळं रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, राजापूर, चिपळून भागांना तडाखा बसला. अनेक भागांमध्ये काजू- आंब्याचं नुकसान झालं, तर सुपारी आणि नारळाच्या बागांनाही या पावसाचा फटका बसला.
हेसुद्धा वाचा : Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण...
तिथं साताऱ्यामध्येही पावसानं हजेरी लावली आणि येथील डोंगराळ भागामध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाली. सध्या पाचगणी, महाबळेश्वर आणि खुद्द साताऱ्यामध्ये गारठा वाढला असून, पावसाची रिमझिमही अधूनमधून पाहायला मिळत आहे.