Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून देशाच्या एका किनारपट्टीवर 'रेमल' चक्रिवादळाचा (Remal Cyclone) धोका असतानाच देशभरातील हवामानावर त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. महाराष्ट्राचं सांगावं तर, राज्याच्या बहुतांश भागांवर काळ्या ढगांची चादर पाहायला मिळत असली तरीही उकाडा वाढण्यापलिकडे काही गोष्टी घडलेल्या नाहीत. मुंबई आणि कोकणात हे चित्र असतानाच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र अवकाळीचा तडाखा पाहायला मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी मुंबईत दिवसाची सुरुवात ढगाळ वातावरणानं झालेली असतानाच दिवस पुढे गेला तसतसा उष्णतेचा दाह आणखी वाढू लागल्याचं पाहायला मिळालं. सोमवारीसुद्धा (27 मे 2024) मुंबई शहर आणि उपनगरामध्ये फारसे बदल अपेक्षित नाहीत. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळ राहील. तापमानाच वाढ झाली नाही, तरी उकाडा अधिक भासून दमटपणा त्रास देईल. शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे अंदाजे 34 आणि 29 अंश सेल्सिअस इतकं असेल. 


तर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकणाचा दक्षिण भाग, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


उष्णतेच्या लाटेचा इशारा 


राज्यातील सहा जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी उष्णतेची लाट किंवा तत्सम परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेची तीव्रता अधिक राहणार असून, देशाच्या उत्तरेकडी राज्यांमध्ये झालेल्या तापमानवाढीमुळं राज्यात हे परिणाम दिसून येत असल्याचं म्हटलं जात आहे. चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, धुळे, जळगावात पुढील तीन दिवस तर, अकोल्यात चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या साऱ्यामध्ये अद्यापही कुठं मान्सूची चिन्हं नसून, मान्सून आता थेट जूनमध्येच चेहरा दाखवणार असल्याचं एकंदर परिस्थिती पाहता लक्षात येत आहे. 


हेसुद्धा वाचा : Share Market: 524 चा शेअर 1392 ला! 'या' कंपनीला मिळालं सरकारी काम; सचिननेही गुंतवलेत 4.99 कोटी


 


बुलढाण्यात टोलनाका उडाला... 


बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला . बुलढाणा, शेगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर शहरात विजांच्या कडकडाट आणि तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला . वादळी वाऱ्यामुळे मलकापूर सोलापूर महामार्गावर दाताळा नजिक असलेला टोलनाका अक्षरशः उडून गेला, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. शिवाय वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर पडल्याने तारा तुटल्यात. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर ग्रामीण परिसरात अनेक घरांची पडझड झाली आहे.