Maharashtra Weather News : मान्सूननं टप्प्याटप्प्यानं आता संपूर्ण देश व्यापला असून, सध्या देशाच्या पंजाबपासून मणिपूरपर्यंत पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळत आहे. इथं महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत पावसानं जोरदार हजेरी लावली असून, किनारपट्टी भागांमध्येसुद्धा पावसाची समाधानकारक हजेरी पाहायला मिळत आहे. सध्या राज्याच्या कोकण पट्ट्यासह घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं पुढील 24 तासांमध्ये या भागात पावसाचा जोर वाढताना दिसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टी भागासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकच्या घाटमाथ्यावर ढगांची दाटी आणि पावसाच्या जोरदार सरींची हजेरी असेल. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. 


दरम्यान, 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असला तरीही त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार असल्यामुळं आता एक नवी चिंता डोकं वर काढताना दिसत आहे. तेव्हा येत्या काही दिवसांमध्ये ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळणार असं म्हणायला हरकत नाही. 


इथं महाराष्ट्रात पाऊस आता त्याचं स्वरुप बदलण्याच्या तयारीत असतानाच देशभरात पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार दिल्लीपासून उत्तर प्रदेशातील बहुतांश भागांपर्यंत मान्सूननं मजल मारली आहे. तिथं दक्षिण भारतात पाऊस अविरत कोसळत असतानाच मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचलपर्यंत त्याची हजेरी पाहायला मिळत आहे. 


हेसुद्धा वाचा : माळशेज, खडकवासलाला जाताय? पुण्यानजीक कोणत्याही ठिकाणी जाण्याआधी वाचा ही बातमी, नाहीतर...  


हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये उत्तराखंडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय सिक्कीम, बिहार, आसाम, उप हिमालयीन क्षेत्र, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि जम्मूपर्यंत मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये राज्यासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये दरड आणि भूस्खलनाच्या घटना घडण्याची भीती असल्यामुळं नागरिकांनाही यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.