Maharashtra Weather News : मागील 24 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये बरसमाऱ्या पावसाचा जोर आता विदर्भ आणि मराठवाड्याच वाढताना दिसणार आहे. याशिवाय राज्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये काळ्या ढगांची दाटी पाहायला मिळणार असून, इथं दृश्यमानतेवर काहीसा परिणाम होताना दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढील 24 तासांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. 


मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असून, यादरम्यान ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, विदर्भात ही चित्र वेगळं नाही. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासबह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईत मात्र हा पाऊस काहीशी विश्रांती घेताना दिसणार असला तरीही अधुनमधून येणाऱ्या सरी मात्र नागरिकांची तारांबळ उडवताना दिसणार आहेत. 


हेसुद्धा वाचा : Big News : डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; पाच ठार 


 


सध्या बंगालचा उपसागर आणि नजीकच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्यामुळं कोकणापासून घाटमाथ्यांपर्यंत पावसाचा जोर वाढला आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रावरही पावसाळी ढगांची चादर पाहायला मिळत आहे. सध्या मान्सूनचा प्रभाव असणारा आणखी एक कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून पश्चिम बंगाल आणि पुढं बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असून त्यात गुजरात ते केरळमधील मान्सूनच्या पूरक स्थितीचीही भर पडताना दिसत आहे. ज्यामुळं फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


पुढील 24 तासांमध्ये हवामान विभागानं उत्तराखंड, हिमाचल प्रदेश इथं अनुक्रमे मुसळधार आणि तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तराखंडमधील नैना, चंपारण, पिथोरगढ, देहरादून इथं मुसळधार पावसामुळं काही अडचणी उदभवू शकतात असा इशारासुद्धा हवामान विभागानं दिला आहे. तर, हिमाचलमध्ये 21 जुलैपर्यंत कमीजास्त प्रमाणात पावसाची हजेरी पाहायला मिळेल असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 


आयएमडीनं पुढील 24 तासांसाठी नागालँड, ओडिशा आणि छत्तीसगढमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, त्याचा सर्वदूर परिणाम देशभरातील तापमानावर दिसून येणार असल्याचं सांगितलं आहे.