Maharashtra Weather News : बापरे! पावसाचा जोर ओसरला? विदर्भ वगळता उर्वरित राज्यासाठी मान्सूनचा निराशाजनक अंदाज
Maharashtra Weather News : कोकणात पावसाची काय परिस्थिती? पिकांना पुरेसं पाणी मिळणार की नाही? जाणून घ्या हवामानाचा अंदाज...
Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) दमदार आगमन केल्यानंतर पावसाच्या सरींनी संपूर्ण महाराष्ट्राला ओलंचिंब केलं. पाहता पाहता मान्सूनच्या या वाऱ्यांनी संपूर्ण राज्य व्यापलं. गेल्या आठवड्यापासून याच मान्सूननं देशभरातील इतर राज्यांची वेसही ओलांडली. ज्यामुळं उत्तर भारतापर्यंत या पावसानं मजल मारल्याचं पाहायला मिळालं. तिथं देशाच्या उत्तरेकडे मान्सूननं नागरिकांना सुखावल असलं तरीही महाराष्ट्रातील त्याचा जोर तुलनेनं कमी होताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचा सक्रिय कमी दाबाचा पट्टा उत्तरेच्या दिशेनं वळला असल्यामुळं राज्यात पावसाचा जोर काही अंशी कमी झाला आहे. तिथं कोकण आणि घाटमाथ्यावरील परिसरामध्ये जिथं मान्सून मनसोक्त बरसत होता तिथंही त्यानं उसंत घेतली आहे. तर, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर भागातही मान्सूननं उघडीप दिल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला विदर्भ वगळता इतर भागांमध्ये पाऊस निराशा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भाला सध्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, राज्याच्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह किनारपट्टी क्षेत्रामध्ये काहीशी तापमानवाढ पाहायला मिळू शकते.
हेसुद्धा वाचा : Team India : तहान, भूकेसह झोपही विसरले क्रिकेटप्रेमी; टीम इंडियाच्या विमानावर क्षणोक्षणी अशी ठेवली नजर...
पाण्याची चिंता कायम...
यंदा राज्यात मान्सून वेळेआधीच दाखल झाला असला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही ही बाब नाकारता येणार नाही. दोन जुलैपर्यंत राज्यातील प्रमुख धरणांतील एकूण पाणीसाठा केवळ 21.84% इतकाच आहे. पुणे आणि औरंगाबाद विभागात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहीलाय तर अमरावती आणि विदर्भातील जलसाठा समाधानकारक आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांना अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे, त्यामुळे हा वरुणराजा आतातरी कृपा दाखवतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.