Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; `इथं` मात्र अवकाळीचं संकट
Maharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
Maharashtra Weather News : अवकाळीचं सावट राज्यातून माघार घेताना दिसत असतानाच आता उन्हाचा तडाखा दुपटीनं वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर भागांमध्ये हवामानाचं रौद्र रुप संकटांमध्ये भर टाकताना दिसत आहे. तर, कोकणातील बहुतांश भागाला उष्णतेच्या धर्तीवर यलो अलर्ट देण्याचत आला आहे. कोकणात पुढील 24 तासांसाठी हवामान दमट राहणार असून, त्यामुळं उष्णतेचा दाह अधिक भासणार आहे. तर, उर्वरित राज्यात तापमानात लक्षणीय वाढ पाहायला मिळणार आहे.
सध्याच्या घडीला राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापुरात करण्यात आली असून, इथं तापमानाचा आकडा 43 अंशांवर होता. तर, परभणी, जळगाव, नांदेडमध्ये तापमान 42 अंशांवर पोहोचलं होतं. मुंबईपासून रायगडपर्यंत दमट वातावरणानं अडचणींमध्ये वाढ केल्याचं पाहायला मिळालं असून, पुढच्या 24 तासांमध्ये ही परिस्थिती सुधारणार नाही असंही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या सविस्तर आढाव्यानुसार उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर, कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.