Maharashtra Weather News : राज्यापासून काहीसा दुरावलेला मान्सून आता परतला असून, या मान्सूननं आता राज्यासह देशातही आगेकूच करण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, पुढील 48 तासांमध्ये मान्सूनचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. थोडक्यात हा वीकेंड पाऊसच गाजवणार हे स्पष्ट आहे. (Monsoon Updates)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील 24 तासांसाठी विदर्भात मान्सूनची जोरदार हजेरी राहणार असून, इथं पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा असं चित्र राहून मध्यम ते अती मुसळधार स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान ताशी 40-50 किमी इतक्या वेगानं वारे वाहणार असल्याचंही सांगितलं गेलं आहे. 


विदर्भाप्रमाणं कोकणालाही मुसळधार पावसाचा तडाखा बसणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवत इथं पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 



राज्यातील विदर्भासह पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर तुलनेनं जास्त राहणार असून, काही भागांमध्ये धुक्यामुळं दृश्यमानतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किनारपट्टी भागांमध्ये मात्र सोसाट्याचा वारा अडचणी वाढवणार असल्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


हेसुद्धा वाचा : विधानपरिषद निवडणुकीला स्थगिती? शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत


 


पावसाळी सहली... 


हवामान विभागानं सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पुणे, सातारामध्ये यलो अलर्ट  जारी केला आहे. तर, अमरावती, गडचिरोली, यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं समाधानकारक हजेरी लावल्यामुळं आता पावसाळी सहलींचे बेत आखले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. या साऱ्यामध्ये धबधबा , ट्रेक किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पावसाळी सहलीसाठी गेलं असता अतिउत्साही पणाला आवर घालण्याचं आवाहन प्रशासनानं नागरिकांना केलं आहे. कोणत्याही कृतीमुळं आपला आणि इतरांचा जीव धोक्यात येणार नाही, याची काळजी घेण्यातं आवाहन यंत्रणा करत आहेत.