विधानपरिषद निवडणुकीला स्थगिती? शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केलीय. ठाकरे गट यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे  विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताय. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी ही निवडणुक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

राजीव कासले | Updated: Jun 20, 2024, 10:54 PM IST
विधानपरिषद निवडणुकीला स्थगिती? शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत title=

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होणाराय. मात्र या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) केलीय. यासाठी ठाकरे गट न्यायालयात (Court) जाण्याची शक्यता आहेत. ठाकरे गटाने ही मागणी का केलीय त्यावर एक नजर टाकूया. 

विधानपरिषद निवडणुकीला स्थगिती?
आमदार अपात्रता, पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण प्रलंबित आहे.  विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट कोर्टात गेलाय.  पक्ष, चिन्ह आणि अपात्रतेवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तसंच आमदारावर अपात्रतेची कारवाई झाली तर निवडूण येणाऱ्या आमदारांचं काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेची ही निवडणूक (Vidhan Parishad Election) घटनाबाह्य असल्याचं म्हणत निवडणूक रद्द करण्याची मागणी केलीय.

तर ठाकरे गटाच्या स्थगितीच्या मागणीवर शिदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. काही निघालं की हे कोर्टात जाणार म्हणतात. तुम्हाला कोण थांबतंय ? तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. वल्गना कशाला करता. सरकार उबाठाचं येणार नाही कांग्रेसचं येणार. यांना फक्त नाचायचं आहे हे ब्यांड वाले आहेत अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. तसंच कोणत्या झेंड्यावर कोणतं चिन्ह लावायचं हा आमचा विषय आहे. 
उद्धव ठाकरे यांचा आवडता रंग हिरवा आहे. त्यांनी हिरव्या रंगावर मशाल छापावी असा टोलाही त्यांनी लगावलाय.

दुसरीकडे विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय. विधानसभेच्या संख्याबळानुसार विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 23 पहिल्या पसंतीची मतं मिळणं आवश्यक आहे. त्यानुसार कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात एक नजर टाकुया..  

कुणाचे किती आमदार निवडून येतील?
- भाजपचे 103 आमदार आहेत त्यांचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात
- शिवसेना शिंदे गटाचे 38 आमदार आहेत त्यांचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात
- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 39 आमदार आहेत त्यांचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात
- काँग्रेसचे 36 आमदार आहेत त्यांचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो
- शरद पवार गट - 14 आमदार आहेत तर ठाकरे गटाचे 15 आमदार आहे दोघांचा मिळून 1 उमेदवार निवडून येऊ शकतात

आपापल्या संख्याबळाप्रमाणे प्रत्येक पक्षाने उमेदवार दिले तर निवडणुक बिनविरोध पार पडेल. मात्र संख्याबळापेक्षा जास्त उमेदवार दिले तर मात्र आमदारांची मतं फुटण्याची भीती सगळ्याच पक्षांना आहे. त्यामुळंच झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्यासाठी सगळ्यांचेच बिनविरोधचे प्रयत्न सुरू आहेत.