Weather News : दक्षिण मुंबईत पावसाची हजेरी; राज्याच्या `या` भागात पुढील तीन दिवस पावसाचे
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान बदलांनी अनेकांनाच चक्रावून सोडलं असून, मुंबईतही पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळाली आहे.
Maharashtra Weather News : फेब्रुवारीचा महिना संपून मार्च उजाडला तरीही राज्यातील आणि देशातील हवामान बदलांचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. सध्याच्या घडीला हवामानाची चिन्हं पाहता मार्च महिन्याचं स्वागत पावसानंच झाल्याचं स्पष्ट होत आहे. उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतामध्ये पावसाची हजेरी असून पुढील तीन दिवसांसाठी हेच चित्र पाहायला मिळेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईच्या दक्षिण मुंबई भागातही शुक्रवारी पहाटे पावसानं हजेरी लावली, तर शहरातील उर्वरित भागावर पावसाच्या ढगांचं सावट पाहायला मिळालं.
पुढच्या तीन दिवसांसाठी हवामानाची ही प्रणाली कायम राहणार असून, व्हीकेंडही हा पाऊसच गाजवणार हे नक्की. पावसासाठी तयार झालेलं हे वातावरण पाहता हवामान विभागाच्या वतीनं काही भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्याच्या काही भागांमध्ये मात्र ढगांची दाटीच पाहायला मिळेल.
हेसुद्धा वाचा : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'बेस्ट'चा प्रवास 1 मार्चपासून महागणार
शुक्रवारी धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि कोकण पट्ट्यामध्येसुद्धा पावसाळी वातावरण आणि मधूनच उन्हाचा दाह जाणवण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठाणे, रायगड, नंदुरबार, पुणे या भागातही जोरदार पावसाची शक्यता असेल. तरजालना, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिमलाही पाऊस झोडपण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात काही भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शनिवारी मात्र पावसाचा अधिकाधिक ओघ विदर्भाकडे पाहायला मिळू शकतो.
देशातही पावसाचाच अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या 24 तासांमध्ये दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या तीन दिवसांसाठी हेच हवामान कायम राहणार आहे. सध्या हिमालयाच्या पश्चिमेकडे होत असणाऱ्या बदलांमुळं हवामानातही हे बदल होत असून, उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
तिथं देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये म्हणजेच काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये 1 आणि 2 मार्च रोजी पावसासह बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटामुळं संकट ओढावण्याची शक्यता आहे. हवामानात होणारे हे मोठे बदल पाहता सध्या अनेक ठिकाणी प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन विभागालाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.