Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार पुनरागमन; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार?
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस दमदार कमबॅक करताना दिसणार आहे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Maharashtra Weather News : जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून धीम्या गतीनं पाऊस परतीच्या वाटेवर निघाला की काय? असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. असं असतानाच आता ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा उलटल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, आता श्रावणसरी आणि अधूमधून गडद काळे मेघही कोकणासह विदर्भापर्यंत मनमुराद बरसताना दिसणार आहेत. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागानं कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण अंशतः ढगाळ आकाश राहणार असून, पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यात मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. फक्त कोकणच नव्हे, तर तिथं सातारा आणि कोल्हापुरासह जळगावातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेसुद्धा वाचा : '..तर मी राजकारणातून संन्यास घेईन' मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
सध्याच्या घडीला बांगलादेशचा दक्षिण भाग आणि नजीकच्या भागावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून, हवामानाची ही दिशा येत्या काळात वायव्येकडे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच तामिळनाडू आणि कोमोरिनपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारल्यामुळं देशासह राज्यावर पुन्हा एकदा पावसाची कृपा होताना दिसत आहे.