Maharashtra Weather News : ऑक्टोबर हिटमध्ये करा पावसाळी सहलीचा बेत; राज्याच्या `या` भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार
Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उष्णता वाढलेली असतानाच काही भागांमध्ये मात्र अचानकच पावसाला सुरुवात होताना दिसत आहे.
Maharashtra Weather News : मान्सूननं राज्यातून काढता पाय घेतला असला तरीही आता मात्र अवकाळी पावसानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी पाऊस निर्धारित वेळेत माघारी गेला आणि त्याची पाठ फिरताच राज्यातील तापमानात लक्षणीय बदल झाले. अनेक ठिकाणी ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला, त्यातच पावसानं लावलेल्या हजेरीमुळं राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इथं राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असतानाच तिथं एकाएकी मुंबई आणि कोकणासह दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेली लावल्यामुळं आता पुन्हा एकदा वातावरणानं सुखद रुप दाखवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं या ऑक्टोबर हिटच्या दिवसांमध्ये पावसाळी, ताटकळलेल्या सहलीचा बेत आखणं व्यर्थ ठरणार नाही.
राज्यात अवकाळीची हजेरी असली तरीही जिथं पावसानं उघडीप दिली आहे, त्या भागांमध्ये मात्र उन्हाचा चटका वाढत आहे. विदर्भ, सांगली आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांचा यात समावेश. तर, मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागने व्यक्त केला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये
वादळी वाऱ्यासह पावसाची असून, सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. पुढील 48 तासांमध्ये ही स्थिती कायम राहिल असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.
अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा आणि...
अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भागातून लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांमुळं अरबी समुद्रावर कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होताना दिसत आहे. या वाऱ्यांना सध्या पश्चिमेला गती मिळाल्यामुळं आंध्र प्रदेशच्या दक्षिणेपर्यंत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. ज्यामुळं यादरम्यानच्या काळात दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील काही भागांमध्येही पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेसुद्धा वाचा : श्रीवर्धनमध्ये 'पॉवर'बाज खेळी? शरद पवारांची तटकरेंविरोधात तटबंदी
सातारा, कोल्हापूर, पुणे या क्षेत्रांमध्ये घाटमाथ्यावर पावसाच्या ढगांची दाटी पाहायला मिळेल. तर, हवेत काहीसा गारवाही जाणवणार आहे. एकंदरच आठवडी सुट्टीच्या दिवशीच वातावरणानं अनपेक्षितपणे दाखवलेलं हे रुप अनेकांनाच दिलासा देणारं आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.