Maharashtra Weather News : उन्हाळ्याची सुरुवात झालेली असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये मात्र अवकाळीचं संकट आणखी बळावताना दिसत आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी तापमानात चांगलीच घट होताना दिसत आहे. तर, उत्तप महाराष्ट्रातही गारठा अनुभवता येत आहे. विदर्भ मात्र यास अपवाद ठरत असून, हवामान विभागानं इथं वादळी पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी असेल. ज्यामुळं इथं यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान बदलांमुळं राज्यात पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका अधिक तीव्र होताना दिसत आहे. उत्तर भारतातल्या हिमवर्षावामुळे राज्यात थंडी कायम असली तरीही उन्हाचा दाह मात्र अडचणी वाढवताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भापासून केरळपर्यंत सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आता निवळला असला तरीही मालदीवपासून कर्नाटकपर्यंत आणि पूर्वमध्य अरबी समुद्रापासून अरबी समुद्रापर्यंत मात्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळं वादळी पावसासह तापमानातील चढ- उताराचा इशारा देण्यात आला आहे.  


राज्यात अवकाळीचं थैमान 


जालन्यातल्या शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. जालन्यातल्या जाफ्राबाद तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तुफान झोडपलय. जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी, आकोला देव येथे तुफान गारपीट झालीय. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावला असून शेती पीक आणि फळबागांचे यात मोठे नुकसान झालं. 


हेसुद्धा वाचा : Mumbai News : अरे देवा! आज मुंबई शहर आणि उपनगरात पाणीपुरवठा 30- 100 टक्के बंद


तर तिथं, बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. नांदुरा, जळगाव जामोद आणि मलकापूर तालुक्यातील परिसरात गारपीटीसह मुसळधार पाऊस झालाय. यामध्ये शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पीक असलेल्या गहू, हरबरा, कांदा, भाजीपाला आणि फळबागांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 


सिंदखेड राजा आणि दुसर बीडमध्येही जोरदार गारपीट झाली. त्यामुळे रस्त्यारस्त्यांवर गारांचा खच पाहायला मिळाला. हा बर्फ पाहता जणू काश्मीरला आल्याचा अनुभव बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीटीमुळे आला. एकंदर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आलेलं हे संकट  पाहता आता निसर्ग आणखी किती कोपणार? हाच चिंतेत पाडणारा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.