Mumbai Weather News : कुठे वादळी पाऊस अन् कुठे घाम फोडणारा उकाडा; पुढील 24 तासात कसं असेल राज्यातील हवामान?
Mumbai Weather News : राज्यातील हवामानाचं नवं रुप... थंडीची चाहूल लागली खरी पण, पुढे काय? आणखी किती दिवस थंडी हातावर तुरी देणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Mumbai Weather News : दिवाळीच्या मुहूर्तावर पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. या पूर्वानुमानानुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. पुढील 24 तासांमध्येही राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची हजेरी कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अरबी समुद्राच्या नैऋत्येसह आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिकी असल्यामुळं रत्नागिरी, कणकली, वैभववाडी, लांजा आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांमध्ये सध्या पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचं सावट असलं तरीही काही भाग मात्र इथं अपवाद ठरतील. काही भागांमध्ये पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी जाणवणार असली तरीही उर्वरित दिवसांमध्ये मात्र तापमानात वाढ होणार असल्यामुळं उष्मा अधिक जाणवणार आहे.
हवामान विभागाच्यचा अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, सातारा, रत्नागिरीमध्ये वादळी पावसाचा इशारा देत नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे.
मुंबईत उष्णतेहा दाह पाठ सोडेना
गुरुवारी मुंबईत तापमानवाढ झाल्याची बाब निदर्शनास आली. यावेळी कमाल तापमान 35 ते 36 अंशांच्या दरम्यान पाहायला मिळालं. पुढील दोन दिवस मुंबईतील कमाल तापमानात फारसा बदल दिसणार नाही. सध्या मान्सूनच्या पावसाचा परतीचा प्रवास पूर्ण झाला असल्यामुळं हवेतील आर्द्रता वाढल्याने पुढील दोन दिवस दाह आणखी त्रासदायक ठरणार आहे.