Maharashtra Weather  News : (Monsoon) मान्सूननं भारताची वेस ओलांडली असून, अंदमानात हे मोसमी वारे दाखल झाल्यामुळं आता ते महाराष्ट्रात केव्हा धडकतात याची उत्सुकता फक्त बळीराजालाच नव्हे, तर राज्यातील प्रत्येकालाच लागून राहिली आहे. साधारण मागील दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाची हजेरी असली तरीही हा मान्सून नसून, पूर्वमोसमी आणि (unseasonal rain) अवकाळी पाऊस आहे असं हवामान विभागानं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीच्या दिशेनं जाणारा हा आठवडाही राज्याच्या काही भागांसाठी पावसाचाच असणार आहे असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. इतकंच नव्हे, तर राज्याच्या आणि देशाच्या काही भागांसाठी उष्णतेचा इशारासुद्धा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांत कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर, कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये साधारण 40 ते 50 किमी प्रतितास इतक्या वेगानं वागे वाहत हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


विदर्भात प्रामुख्यानं अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना, लातूर, नांदेड या भागांमध्ये  पावसाची शक्यता आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापुरातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी, तर कुठं ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात दमट वातावरण वाढणार असून, काही भागांना वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra HSC Board Result 2024 LIVE: आज बारावीचा निकाल; वेळ, वेबसाईट... सर्वात वेगवान अपडेट्स एका क्लिकवर


देश स्तरावरील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास उत्तर भारतासह इशान्य भारत, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांमध्ये किमान पुढचे तीन दिवस उकाडा कायम राहणार आहे. येत्या काळात बंगालच्या उपसागरामध्ये नैऋत्येला 22 मे नंतर कमी दाबाचा पट्टा तयार होऊन 24 मे पर्यंत त्याची तीव्रता आणखी वाढेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


मान्सूनची खबरबात! 


अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये दाखल झालेला मान्सून आता केरळ रोखानं प्रवास सुरु करणार आहे. सध्याच्या घडीला मान्सून वाऱ्यांचा वेग पाहता येत्या काळात हाच वेग कायम राहिल्यास 31 मे पर्यंत हे वारे केरळात दाखल होतील. यादरम्य़ान तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल या भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथं केरळातून पुढे येणारा मान्सून 15 जूनच्या आधीच महाराष्ट्राच्या वेशीत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साधारण 6 ते 10 जूनदरम्यान मान्सून राज्यात बरसू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.