Maharashtra Weather News :  राज्यातील हवामानात सातत्यानं होणारे बदल आता नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम करताना दिसत आहेत. याच कारणास्तव राज्यातील वाढता उकाडा पाहता आरोग्य विभागानं नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत उष्माघातापासून वाचण्यासाठी काही उपाययोनाही सुचवल्या आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये सूर्यानं आग ओकण्यास सुरुवात केली आहे. देशभरात नुकतंच अकोल्यात सर्वाधिक म्हणजेच 42.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या वेळीसुद्धा राज्यात तापमानाचा आकडा वाढला असून, नांदेड, अकोला, बुलढाण्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला राज्यातील सरासरी तापमान 40 अंशांहून जास्तच असल्यामुळं साधारण 4.5 अंशांनी वाढ झाल्याचं लक्षात येत आहे. 


कुठे दिला पावसाचा इशारा? 


एकिकडे राज्यात उकाडा वाढत असतानाच दुसरीकडे पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशीव, लातूर, सांगली, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूरसह साताऱ्यातही तुरळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणच्या किनारपट्टी भागामध्ये उष्णता अधिक तीव्र जाणवेल, तर  अंतर्गत भागांमध्ये ढगाळ वातावरण असूनही उकाडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेणार नाहीय. 


हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 Live updates : शिंदे गटात गोविंदा आला रेsss; राज्यात आज कोणत्या राजकीय घडामोडी?


देशात उष्णतेची लाट 


मागील काही दिवसांपासून देशात सातत्यानं हवामानात बदल होताना दिसत आहेत. यामध्ये काही भागांचं तापमान चाळीपार गेलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असून उष्ण वारे नागरिकांना हैराण करणार आहेत. 


स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार मागील 24 तासांमध्ये जम्मू काश्मीर, बाल्टीस्तान, मुजफ्फराबाद इथं पावसासह बर्फवृष्टीचीही हजेरी पाहायला मिळाली. हिमाचल प्रदेशातील पर्वतीय क्षेत्रांमध्येही असंच काहीसं चित्र दिसलं असून, पुढील 24 तासांमध्ये या भागांमधील हवामानात फारसे बदल अपेक्षित नाहीत. पूर्वोत्तर भारतामध्येही पावसाच्या तुरळक सरींची हजेरी असल्यामुळं हवेत गारवा निर्माण होणार आहे. उत्तर भारतासह दक्षिण भारतातील काही भाग मात्र यास अपवाद ठरणार असून, इथं उकाडा आणखी वाढणार आहे.