Maharashtra Weather News : श्रावण महिन्याला सुरुवात झाली तरीही अविरत कोसळणारा पाऊस मात्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसल्यामुळं अनेकांच्याच चिंतेत भर पडली होती. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या होत्या, काहींनी तर धोक्याची आणि इशारा पातळीसुद्धा ओलांडली होती. तर काही ठिकाणी पूरस्थिती ओढावल्यानं मोठी वित्तहानी झाली होती. हे असं चित्र असतानाच आता मात्र एक दिलासा देणारं वृत्त समोर आलं आहे. कारण, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आता हा पाऊस काहीशी विश्रांती घेताना दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वगळता त्यापलिकडे मात्र पाऊस काही प्रमाणात सुट्टीच्या बेतातच दिसणार आहे. अधूनमधून येणारी सूर्यकिरणं दिलासा देणारी ठरणार असून किमान पुढील चार दिवस ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळणार आहे असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


राजस्थानचा आग्नेय भाग आणि नजीकच्या भागावर सक्रिय असणारं कमी दाबाचं क्षेत्र आता निवळण्यास सुरुवात झाली असून, गुजरातच्या दक्षिणेपासून केरळच्या उत्तरेपर्यंत मात्र कमी दाबाचा पट्टाही सक्रिय आहे. त्यामुळं पावसाच्या तुरळक सरी वगळता त्याचं रौद्र रुप तूर्तास पाहायला मिळणार नाही हे स्पष्ट. 


हेसुद्धा वाचा : चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी 20 विशेष ट्रेनची सोय; 'या' तारखेपासून बुकिंग सुरू


 


इथं पावसाचा जोर काही अंशी ओसरत असतानाच तिथं कोकणातील रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भाला पावसाचा इशारा असून, अधूनमधून विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या मध्य महाराष्ट्र, मराठावाडा, उत्तर महाराष्ट्रातही पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता आहे.