Bhandara Heat Stroke Person Died : महाराष्ट्रात सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुपारच्या दरम्यान उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. एकीकडे आरोग्य विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. वाढत्या तापमानामुळे अनेकांना त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे. 


उपचारादरम्यान मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर तरारे (51) या व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तो व्यक्ती भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर या ठिकाणी वास्तव्यास होता. उन्हाचा त्रास जाणवू लागल्याने भास्कर तरारे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान भास्कर यांचा मृत्यू झाला. 


नागरिकांनी घराबाहेर पडू नये


भंडारा जिल्ह्याच्या तापमानात सतत वाढ होत आहे. या जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून जिल्ह्यात आज 45 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्तेही निर्मनुष्य झाले आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला जात आहे. त्यातच आता उन्हाचा त्रास झाल्याने लोक आजारी पडत असल्याचे बोललं जात आहे. उष्माघाताचा पहिला बळी भंडारा जिल्ह्यात गेला असून आणखी पाच रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाला उपचार घेण्यासाठी दाखल आहेत.


विदर्भात उष्माघाताचे चार बळी


दरम्यान विदर्भात उष्माघाताने आतापर्यंत चार बळी घेतले आहेत. उष्माघातामुळे यवतमाळमध्ये दोघांचा, बुलढाण्यात एकाचा मृत्यू आणि भंडाऱ्यात एकाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात उष्माघाताने नऊ महिन्याच्या चिमुकलीसह वृद्धाचा मृत्यू झाला होता. बेलोरा येथील विद्या निलेश टेकाम असं मृत चिमुकल्या मुलीचं नाव आहे. तर चिचमंडळ येथील दादाजी मारुती भुते असे 70 वर्षीय मृत वृद्धाचे नाव आहे. 


तसेच बुलढाण्यातील संग्रामपूर येथे उष्माघाताने शेतात काम करत असलेल्या मजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. सचिन वामनराव पेठारे असं उष्माघाताने मृत्यू पावलेल्या 40 वर्षीय मजुराचं नाव आहे.