Maharashtra Weather Updates : राज्यात सध्या कोरडं हवामान पाहायला मिळत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र असल्यामुळं राज्यातील कमाल तापमानातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये वातावरण कोरडं असेल. तर, काही भागांमध्ये आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान सर्वसामान्याहून जास्तच असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोडक्यात महाराष्ट्रात उन्हाळा सुरु झाला असून, दर दिवसागणिक तापमानात सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचे ढग होते. पण, आता हे ढग दूर गेले असले तरीही राज्याचा काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहे. त्यामुळं आता अवकाळीचं सावट पूर्णपणे निवळलं नाही हेच स्पष्ट होत आहे. पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या किनारपट्टी भागाला उष्णतेचा दाह अधिक जाणवणार आहे. 


पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार उत्तर पाकिस्तानवर एक पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण होत आहे. परिणामी जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तर, काही भागांवर धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे. पुढच्या 72 तासांमध्ये तापमानात मोठी घट अपेक्षित नसून, बहुतांशी थंडी कमी झाल्याचं पाहायला मिळेल. 


दरम्यान, पुण्यामध्ये पुढच्या 24 तासांत हवामान कोरडं राहणार असून, वातावरण मात्र ढगाळ असेल. तापमानात घट होणार नसल्यामुळं वातावरणाची ही कोंडी तुम्हाला त्रास देऊ शकते. दरम्यान राज्याचा विदर्भ आणि मराठवाड्याचील निवडक भाग वगळता आता उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत ही बाब नाकारता येत नाहीये. त्यामुळं आता उन्हाच्या झळांचा सामना करण्यासाठी उपाय करावे लागणार हेसुद्धा तितकंच खरं. 


हेसुद्धा वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार; इतिहासाची छाप सोडणारे समुद्री किल्ले


'स्कायमेट' या खासगी हवामानसंस्थेच्या माहितीनुसार लडाख, गिलगिट, जम्मू काश्मीरच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये बर्फवृष्टी पाहायला मिळेल. तर, काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये काही भागांना गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर, राजस्थानवरही पावसाच्या ढगांचं सावट असेल.