छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार; इतिहासाची छाप सोडणारे समुद्री किल्ले

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असेही म्हटले जाते. सागरी तटबंदी भक्कम असेल, तरच शत्रूवर विजय मिळवता येतो. स्वराज्यातील हे जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देतात. 

Updated: Feb 18, 2024, 09:05 PM IST
छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार; इतिहासाची छाप सोडणारे समुद्री किल्ले  title=

'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' शेकडो वर्षांपुर्वी हे छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त ओळखलंच नाही तर, सागरी तटबंदी भक्कम करण्यासाठी स्वराज्याचं आरमार स्थापन केलं. महाराजांची दूरदृष्टी आज ही तितकीच लागू होते, म्हणूनच द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणूनही शिवरायांचा उल्लेख होतो. 

किल्ले दुर्गाडी


स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ किल्ले दुर्गाडीवर रोवली गेली. किल्ले दुर्गाडी हा मराठ्यांच्या आरमारातील  पहिला किल्ला म्हणून ओळखला जातो. सातवाहनाच्या काळात कल्याण हे व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखले जात होते. किल्ले दुर्गाडीवर असलेल्या मराठ्यांच्या चौकीमुळे मुंबईचे इंग्रज, वसईचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याच्या सिद्धीला वचक बसला होता. 

किल्ले सिंधुदुर्ग


किनारपट्टी भागात पोर्तुगीजांची सत्ता वाढत चालली होती. परदेशी व्यापाऱ्यांवर आपली करडी नजर राहण्यासाठी स्वराज्याच्या आरमाराचे केंद्र म्हणून महाराजांनी मालवणच्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थापना केली. या किल्ले बांधणीची सुत्रं हिरोजी इंदुलकरांनी 1664 मध्ये हाती घेतली. या किल्ले बांधणीला सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागल्याचं म्हटलं जातं. 

किल्ले विजयदुर्ग 


 शिलाहार घराण्याचा राजा भोज याने इ.स.1195 मध्ये घेरीया किल्यांची बांधणी केली. 
देवगडच्या समुद्रात 17 एकर परिसरात विस्तारलेला हा किल्ला 1653मध्ये महाराजांनी आदिलशाहीतून स्वराज्यात आणला. घेरीया हा किल्ला पुढे विजयदुर्ग या नावाने ओळखला गेला. 

किल्ले पद्मदुर्ग 


मराठ्यांच्या आरमारातील महत्त्वाच्या जलदुर्गांपैकी एक म्हणजे पद्मदुर्ग.जंजिरा स्वराज्यात आणण्यासाठी महरांजांनी अथक प्रयत्न करूनही यश हाती आलं नाही.जंजिऱ्याच्या सिद्धीच्या कुरापतींवर करडी नजर रहावी याकरीता, महाराजांनी राजापुरच्या कांसा बेटावर पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी केली.या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा कमळाच्या आकाराचा दिसतो. 

किल्ले  खांदेरी 


मुंबईत असलेले इंग्रज आणि जंजिऱ्याचा सिद्धी यांचे एकमेकांशी राजकीय संबंध चांगले होते. इंग्रज आणि सिद्धी एकत्र येत कोणताही दगाफटका करू नये याकरीता महाराजांनी खांदेरी किल्ल्याची बांधणी केली. 

  किल्ले कुलाबा

खांदेरी-उंदेरी आणि मुरुडच्या जंजिऱ्याच्या जवळ असलेला आणखी एक जलदुर्ग म्हणजे अलिबागचा कुलाबा किल्ला. मराठ्यांच्या नौदलातील जलदुर्गांपैकी एक कुलाबा आहे.1680 मध्ये याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून महाराजांच्या निधनानंतर याचं बांधकाम पूर्ण झालं. शत्रूच्या हालचालींवर लक्ष राहण्यासाठी महाराजांनी या जलदुर्गाची उभारणीचे आदेश दिले होते.सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा कुलाबा मराठ्यांच्या आरमारातील महत्त्वाचा  जलदुर्ग आहे.