Maharashtra Weather Update : होळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाच आता देशभरात सणाच्या रंगांची उधळण होण्याआधी हवामानाचे बदललेले रंग पाहायला मिळत आहेत. एकिकडे दिल्ली आणि उत्तर भारतात उन्हाळा रौद्र रुप धारण करताना दिसत आहे, तर दुसरीकडे मध्य प्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंतच्या भागात पावसाची हजेरी पाहायसला मिळत आहे. या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे. महाराष्ट्रही हवामान बदलांच्या बाबतीत अपवाद ठरलेला नाही. कारण, भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये वादळी वारा, पाऊस आणि गारपीटीची परिस्थिती ओढावल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील 24 तासांसाठी विदर्भामध्ये गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असं असलं तरीही या भागांमध्ये उन्हाचा दाह मात्र कमी होणार नाहीये. त्यामुळं नागरिकांना हवामानाचा दुहेरी मारा सहन करावा लागणार आहे. तिथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तापमानाच काहीशी वाढ नोंदवली जाईल, तर मराठवाड्यावरही पावसाळी ढगांचं सावट असेल. 


सध्या विदर्भासह लगतच्या भागावर चक्राकार वारे वाहत आहेत. ज्यामुळं कर्नाटकाच्या दक्षिण क्षेत्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आहे. विदर्भ आणि नजीकच्या भागांमधील हवामानाची ही स्थिती पाहता इथं हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला असून, राज्याच्या उर्वरित भागात मात्र उन्हाचा तडाखा आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत दिले आहेत. 


हेसुद्धा वाचा : पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर! दशकभरात भट्टीसारख्या तापमानानं जग होरपळलं; घाबरवणारी आकडेवारी समोर 


स्कायमेट वेदरच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये देशाच्या पश्चिम बंगाल आणि ओडिशातील क्षेत्रामध्ये मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इथं काही भागांमध्ये ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर, उत्तर पूर्व भारतामध्ये मध्यम स्वरुपातील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळच्या काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या काश्मीर, हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये बर्फवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.